रत्नागिरी : जमीन महसूल कर, मुद्रांक व नोंदणी फी, राज्य उत्पादन शुल्क, विक्रीकर, वाहनांवरील कर, विजेवरील कर, विक्रेय वस्तू व सेवा कर आदी विविध करांपोटी जिल्ह्याला या आर्थिक वर्षात मार्चअखेर १ अब्ज ११ कोटी १३ लाख ३० हजार २३७ रुपये इतका महसूल मिळवून दिला आहे. यापैकी सर्वाधिक महसूल विक्रीकर (२९ कोटी ६० लाख) आणि वाहनावरील कर (२७ कोटी २१ लाख) यांच्यापासून मिळाला आहे. मात्र, मुद्रांक व नोंदणी शुल्कापोटी गतवर्षीच्या तुलनेत केवळ २६ टक्के महसूल मिळाला आहे. जिल्ह्याला जमीन महसूल, मुद्रांक व नोंदणी फी, राज्य उत्पादन शुल्क, विक्रीकर, वाहनावरील कर, विजेवरील कर तसेच विक्रेय वस्तू व सेवा कर यांच्यामधून दरवर्षी महसूल मिळतो. गतवर्षी (२०१३ - १४) या आर्थिक वर्षात शासनाच्या सर्व कार्यालयांकडून करापोटी १५९ कोटी रूपयांचा महसूल जमा झाला होता. मुद्रांक व नोंदणी फीपोटी तब्बल ६३ कोटी ५८ लाख १२ हजार १६३ एवढा महसूल जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाला होता, तर त्याखालोखाल विक्रीकर (३१ कोटी ७४ लाख ३९ हजार २७२) तसेच वाहनांवरील करापोटी २६ कोटी २८ लाख ६४ हजार ५१४ इतका महसूल मार्च २०१४ अखेर गोळा झाला होता. यावर्षी मात्र, मुद्रांक व नोंदणी कार्यालयाकडून गतवर्षीपेक्षा कमी (१६ कोटी ७४ लाख १९ हजार ४३२) म्हणजे केवळ २६ टक्के महसूल मिळाला आहे. विक्रीकर विभागाचीही वसुली गतवर्षीपेक्षा कमी (२९ कोटी ५९ लाख ५० हजार ३७५ रूपये) झाली आहे. मात्र, यावर्षी जमीन महसूल करापोटी १८ कोटी ३९ लाख ८१ हजार २३० रूपयांचा महसूल मिळाला असून, गतवर्षीपेक्षा यावर्षी या कार्यालयाने जोर लावला आहे. वाहनांवरील करापोटी मिळणाऱ्या महसुलात यावर्षी कमालीची वाढ झाली असून, २७ कोटी २० लाख ८१ हजार २६३ रूपये म्हणजेच गतवर्षीपेक्षा इतका महसूल जिल्हा प्रशासनाला मिळवून दिला आहे. राज्य उत्पादन शुल्कातून ७ कोटी ५९ लाख ४६ हजार, ५५८, विजेवरील करापोटी ४ कोटी १८ लाख ९९ हजार ६३९ आणि विक्रेय वस्तू आणि सेवा करातून ७ कोटी ४० लाख ५१ हजार ७३९ रूपयांचा महसूल मिळाला आहे. यावर्षी या सर्व करांपोटी जिल्हा प्रशासनाला १ अब्ज ११ कोटी १३ लाख ३० हजार २३७ इतका महसूल मिळाला असला तरी गतवर्षीच्या तुलनेने तो कमी आहे. गतवर्षी दीड अब्जापेक्षा अधिक महसूल जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत गोळा झाला होता. यावर्षी एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणूक आणि आॅक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे यावर्षी महसूल कमी मिळाल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
तिजोरीत १ अब्ज ११ कोटी जमा
By admin | Updated: April 25, 2015 01:08 IST