टेंभ्ये : जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीची शनिवारी संध्याकाळी घेण्यात आलेली ऑनलाइन सभा ही जिल्ह्यातील सभासदांची दिशाभूल करत झाली असून या सभेत संचालक मंडळाने केवळ सत्ताधारी सभासदांनाच बोलण्याची संधी देऊन लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणारी सभा झाली असल्याचा आरोप माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर पतपेढीच्या संचालक मंडळाने रविवार २१ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता ठरलेली सभा अचानक बदलून शनिवारी २० मार्च रोजी दुपारी २ वाजता होणार असल्याचे कळवले. त्यानंतर सभेच्या आदल्या दिवशी ही सभा दुपारी ४ वाजता होणार असल्याचे व्हाॅट्सॲपद्वारे कळविण्यात आले. परंतु प्रत्यक्ष ही सभा ४.३० नंतर होणार असल्याचे सभासदांना ऐनवेळी समजले. त्यातच अनेक सभासदांना सभेची सूचनाच मिळाली नाही.
प्रत्यक्ष सभा सुरू झाल्यानंतर सचिवांनी मागील न झालेल्या विषयांवरील इतिवृत्त मंजूर झाल्याची नोंद करत सभासदांची दिशाभूल व हक्काचा भंग केला. याबाबत सभासदांना न बोलू देता इतिवृत्त चुकीच्या व आवाजी पद्धतीने बेकायदेशीररीत्या मंजूर करण्यात आले. अर्धवट झालेल्या सभेचे इतिवृत्त कसे मंजूर करता येते? याबरोबरच संचालक मंडळाकडून होणाऱ्या वारेमाप खर्चाबाबत सभासदांना मत मांडू दिले नाही. सभासदांनी पाठवलेल्या पत्रांचा विचार न करताच एकतर्फी विषय मंजूर करण्यात आले.
याबरोबरच सभासद साहाय्यता निधी ७५ हजार करणे हे सभासदांवर अन्याय करणारे आहे. याउलट संचालकांनी केलेला खर्च सभासदांच्या रकमेची लूट आहे. रत्नागिरी येथील प्रधान कार्यालयाची दुरुस्ती व त्यावर होणारा खर्च पतपेढीवर भुर्दंड वाढवणारा असून, सभासदांची मंजुरी न घेता असे धोरणात्मक निर्णय संचालक मंडळाने घेत सभासदांच्या हक्कावर गदा आणली आहे. त्यामुळे एकतर्फी झालेली ही सभा बेकायदेशीरच आहे, असे पाटील म्हणाले.
चौकट
पतपेढीच्या ऑनलाइन सभेत संचालक मंडळाने केवळ मर्जीतील लोकांनाच बोलू दिले. यामध्ये पतपेढी व सभासदांच्या हिताच्या विषयांवर आपले मत मांडू इच्छिणाऱ्यांना जाणीवपूर्वक बोलू दिले नसल्याचेही पाटील यांनी सांगितले. आपण बोलत असताना मध्येच आपल्याला थांबवत म्यूट करण्यात आल्याचे सागर पाटील यांनी सांगितले.