सागर पाटील - टेंभ्ये, राज्यातील शाळांचे मुल्यांकन करण्यासाठी ‘नॅक’च्या धर्तीवर राज्यस्तरावर सॅक संस्थेची स्थापना केली जाणार आहे. संस्थेचे प्रारुप तयार करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरुन अंमलबजावणी सुरु झाली आहे. येत्या काही दिवसात या संस्थेचे प्रारुप पूर्ण होईल व राज्यातील शाळांचे महाविद्यालयांप्रमाणे मुल्यांकन केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.राज्यातील शाळांचे मुल्यांकन करण्यासाठी राज्य मुल्यांकन व अधिस्वीकृती संस्था स्थापन करण्याच्या अनुषंगाने १६ एप्रिल २०१४ रोजी राज्यस्तरावर अधिकारी व तज्ज्ञांची एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीतील चर्चेनुसार सॅकची स्थापना करण्याच्या हेतूने अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यास गटामध्ये १६ सदस्यांचा समावेश आहे. शिक्षण आयुक्त हे या गटाचे अध्यक्ष आहेत. सदस्यांमध्ये काही शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, काही शाळांचे मुख्याध्यापक, प्रशासकीय अधिकारी, पालक - शिक्षक संघाचे प्रतिनिधींचा समावेश आहे.हा अभ्यास गट अन्य राज्यांमध्ये शाळांच्या मुल्यांकनाबाबत अवलंबिण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची मुल्यांकन पद्धती, नॅकची कार्यपद्धती यांचा सविस्तर अभ्यास करुन युडायस डाटा २०१३-१४ च्या आधारे राज्यातील शाळांसाठी मुल्यांकनाचे स्वतंत्र निकष ठरविण्यात येणार आहेत.नॅक मानांकनप्राप्त महाविद्यालयांचा वापर सल्लागार म्हणून करुन घेण्यात येणार आहे. हा अभ्यास गट सॅकचे स्वरुप, कार्यपद्धती व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ याचा सविस्तर अहवाल शासनास सादर करणार आहे.अभ्यास गटाच्या नियंत्रणाखाली सॅकची पुस्तिका तयार करण्यासाठी कार्यकारी गटाची रचना करण्यात आली आहे. या कार्यकारी गटामध्ये ११ सदस्यांचा समावेश आहे. शिक्षण आयुक्त गटाचे अध्यक्ष असून, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे सहसंचालक शंकुतला काळे या सदस्य सचिव आहेत. अभ्यास गट व कार्यकारी गटाला आपला अहवाल शासनाकडे एक महिन्यात सादर करणे बंधनकारक आहे. यामुळे येत्या काही दिवसात राज्यामधील शाळांचे सॅकच्या माध्यमातून मुल्यांकन होणार हे निश्चित आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाकडून फ-ेंंू नावाचे मुल्यांकन यापूर्वी केले जात होते. यातील बराचसा भाग सॅकमध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.रत्नागिरीचे विजय पाटील कार्यकारी गटात सॅकची पुस्तिका तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यकारी गटामध्ये रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष विजय पाटील यांचा समावेश आहे. ते सध्या माध्यमिक विद्यालय, ताम्हाणे, ता. राजापूर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सॅक मुल्यांकन पद्धतीमध्ये त्यांचा वाटा महत्त्वपूर्ण होता. सॅकची पुस्तिका तयार करण्यामध्ये त्यांचे योगदान असल्याने त्यांची निवड सॅकच्या कार्यकारी गटावर झाली असल्याचे बोलले जात आहे.
शाळांचे होणार मुल्यांकन
By admin | Updated: July 9, 2014 23:59 IST