रत्नागिरी : जिल्ह्यात वादळी पावसाने गेल्या दोन महिन्यांत ३८७ घरांची पडझड झाली असून, त्यात एकूण ५८ लाखा २९ हजार ९१७ रूपयांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचे एकूण ६४ लाख २ हजार २८६ रूपयांचे नुकसान झाले आहे. या पावसात मृत झालेल्यांची संख्या ५ असून, ६ जनावरांचा बळी गेला आहे. या सर्व नुकसानापोटी जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी २३ लाख ५४ हजार २०३ रूपयांच्या नुकसानाची नोंद आहे. यातील मृतांपैकी जणांच्या वारसांना जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ मदत देण्यात आली. यावर्षी जूनमध्ये पाऊस गायब झाला असला तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार वृष्टी करून जिल्ह्यातील अनेक घरे, गोठे, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यात १० घरांचे आणि ११ गोठ्यांचे पूर्णत: नुकसान झाले आहे, तर ३४० घरांची आणि ३३ गोठ्यांची पडझड झाली आहे. जिल्ह्यात पडझड झालेल्या घरांची एकूण संख्या ३९४ असून, यापैकी फक्त २० घरे व गोठे यांना मदत दिलेली आहे. उर्वरित घरे आणि गोठे यांचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. या सर्वांचे एकूण नुकसान ५८ लाख ४५ हजार ४३२ रूपये इतके झाले आहे.जिल्ह्यातील २४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान ४ लाख ६६ हजार ७५, तर खासगी ४३ मालमत्तेचे ५९ लाख ३६ हजार २११ रूपयांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही मालमत्तांचे एकूण ६४ लाख ०२ हजार २८६ रूपयांचे नुकसान झाले आहे.याशिवाय पुरात, वीज पडून, दरड भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना प्रत्येकी दीड लाखप्रमाणे साडेपाच लाख रूपये जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ मदत देण्यात आली आहे. याच काळात आणखी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र तो नैसर्गिक आपत्तीने झाला नसल्याचे सांगत त्यांना मदत देण्यात आलेली नाही. तसेच या पावसात ६ जनावरांचा बळी गेला असून, एकूण १ लाख ३९ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले आहे. या जनावरांच्या मालकांना नुकसानीची रक्कम देण्यात आली आहे. मात्र, पंचनामे वेळेवर न झाल्याने पडझड झालेल्या घरांची नुकसानभरपाई मिळण्यात अडचण येत आहे. (प्रतिनिधी)
पावसामुळे सव्वाकोटींचे नुकसान
By admin | Updated: August 13, 2014 23:29 IST