चिपळूण : शहर व परिसरामध्ये महापुराने हाहाकार माजविला. यामध्ये अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झालीत. या कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी सावर्डे विद्यालयाने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पुढाकार घेतला. आमदार शेखर निकम यांच्या प्रेरणेने खेर्डी, चिपळूण व कळंबस्ते परिसरातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देऊन विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी घेतली.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्र येऊन सुमारे एक लाख रुपये निधी एकत्र केला. त्या माध्यमातून शंभर कुटुंबांना त्यांच्या गरजेच्या वेळी तत्परतेने खाद्याचे किट वाटप करण्यात आले. खेर्डी, चिपळूण व कळंबस्ते परिसरातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शोध घेऊन त्यांच्या गरजेनुसार वह्या, कंपास शालेय दप्तर इत्यादी वस्तूंची किट ५० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मुख्याध्यापक अन्वर मोडक यांनी पार पाडले आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांचा शोध घेताना खेर्डी विद्यालयातील शिक्षकांची विशेष सहकार्य प्राप्त झाले.
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून गरजेच्या वेळी पुढे येऊन केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, कार्याध्यक्ष शेखर निकम, सचिव महेश महाडिक, शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, सर्व संस्था पदाधिकारी यांनी विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.