लांजा : शासन निर्णयाचा विपर्यास करून चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे भाजपचे नगरसेवक गटनेते संजय यादव सत्ताधारी व जनतेमध्ये वाद लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यांनी सवंग प्रसिद्धीच्या हव्यासापोटी स्वतःचे अज्ञान आणि बालिशपणा दाखवून दिल्याची खरमरीत टीका लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी पत्रकार परिषदेत केली.
प्रसारमाध्यमांशी बाेलताना मनाेहर बाईत यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने शहर व गावातील वाडी-वस्त्या व रस्त्यांना देण्यात आलेल्या जातीवाचक नावांमध्ये बदल घडवून राज्यातील सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दिंगत होण्याच्यादृष्टीने अशा सर्व गावांची रस्त्यांची नावे बदलून जातीवाचक नावांऐवजी महाषुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबाबत नगरविकास विभागाने व ग्रामीण विकास विभागाने निश्चित करून जातीवाचक नावांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने लांजा नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा करण्यात आली होती. मात्र, कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता, असे मनाेहर बाईत यांनी सांगितले.
भाजपचे नगरसेवक संजय यादव हे या सभेला उपस्थित नसल्याने, त्यांनी माहिती न घेताच सत्ताधारी शिवसेना वाड्या, वस्त्यांची नावे बदलत असल्याची ओरड सुरू करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केल्याचा आरोप नगराध्यक्ष बाईत यांनी केला आहे.
शहरातील वाड्यांची नावे बदलण्याचा कोणताही निर्णय नगरपंचायतीच्या दि. २३ ऑगस्ट रोजीच्या झालेल्या सभेत झालेला नसताना, केवळ लोकांची दिशाभूल करून जाणीवपूर्वक जनतेला भडकविण्याचे काम संजय यादव यांनी केले असून, हे खोटे उद्योग त्यांनी थांबवावेत, असे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष मनोहर बाईत, उपनगराध्यक्ष स्वरूप गुरव यांनी पुढे सांगितले की, लांजा कुवे गावातील परंपरागत असलेल्या वाड्यांची नावे बदलण्याचा जाणीवपूर्वक कोणताही हेतू नसून, केवळ शासन निर्णयाची अंमलबजावणी म्हणून केवळ प्रक्रिया हाताळण्यात येणार आहे. संजय यादव यांनी नेहमीप्रमाणे सवंग खोट्या प्रसिद्धीसाठी लांजा कुवेवासीयांच्या भावना भडकवून जनाधार मिळविण्याचा आखलेला कुटिल डाव लांजातील सूज्ञ जनता हाणून पाडून, त्यांची जागा त्यांना दाखवून देईल, असेही त्यांनी सांगितले.