पावसाळ्यात माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने राज्य सरकारने दि. १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदीचा कालावधी जाहीर केला आहे. बंदी कालावधी संपला असला तरी वादळी वाऱ्यामुळे नाैका समुद्रात गेलेल्या नाहीत. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पाैर्णिमेला सागराची पूजा केली जाणार असून, नारळ अर्पण करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही मच्छीमार बांधव जाेपासत आहेत.
मच्छीमार बांधव नारळी पौर्णिमेला बोटींना पताका लावतात, छान रंगरंगोटी करून बोटी सजवतात, बोटींची पूजा करतात आणि मासेमारीसाठी समुद्रात लोटतात. कोळीवाड्यातून मिरवणुका काढल्या जातात. थोरामोठ्यांपासून बच्चे कंपनीसह सगळे वाजतगाजत मिरवणुकीने बंदरावर येतात. पारंपरिक कोळीगीते आणि वाद्याच्या साथीने या मिरवणुका रंगतात. समुद्राला शांत करण्यासाठी नारळाला सोनेरी कागद लावून सजवलेला नारळ समुद्राला अर्पण केला जाताे. त्यानंतर सागराला विनवणी करून यावर्षी जाळ्यात चांगली मासळी मिळू दे, अशी प्रार्थना केली जाते.
जिल्ह्यात साडेतीन हजार मासेमारी नौका असून, सोमवारपासून या नौका मासेमारीसाठी समुद्रात रवाना होणार आहेत. समुद्रकिनारपट्टीच्या वस्तीतून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. मच्छीमार समाज नारळ अर्पण करताेच शिवाय स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस स्थानक, सीमा शुल्क विभागाकडून तसेच नागरिकांकडूनही नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना केली जाते.
-------------------
मच्छिमारांची सागरदेवावरच मदार
मच्छीमार बांधवांचा उदरनिर्वाह मासेवारीवर अवलंबून असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मागे ठेवून कोळी बांधव भरसमुद्रात मासेमारीला जात असतो. त्यामुळे या समाजाची मदार सागरदेवावर अवलंबून असल्यानेच या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळी पौर्णिमनिमित्त खास गोड पदार्थांचा नैवद्य बोटीला व समुद्राला अर्पण केला जातो. समुद्राची यथासांग पूजा करताना, ‘खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या मालकाचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासळी लाभूू दे...’ असे गाऱ्हाणे समुद्राला घातले जाते.
-----------------------
अनेक ठिकाणी रंगतात स्पर्धा
प्रत्येक गावात नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्याच्या काही वेगळ्या परंपराही आहेत. काही ठिकाणी नारळी पौर्णिमेनिमित्त नारळफोडीचा खेळ रंगताे. हातात नारळ घेऊन परस्परांवर आपटून फोडण्याची स्पर्धा भरवली जाते. नारळ फाेडणाऱ्याला बक्षीस म्हणून नारळच दिला जातो. काही ठिकाणी नारळावर लोखंडाचा बॉल मारून नारळ फोडण्याची स्पर्धा रंगते. स्पर्धकापासून सात-आठ फुटांवर नारळ ठेवला जातो. बॉलच्या आकाराचा लोखंडी गोळा त्या नारळावर अचून मारून फोडण्याचे कौशल्य अजमावले जाते. फोडलेला नारळ बक्षीस म्हणून स्पर्धकाला दिला जातो.
- मेहरून नाकाडे