आवाशी : संचारबंदीत दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असणाऱ्या सेवा सुरू ठेवाव्यात, असा आदेश शासनाकडून असल्याने त्याच अत्यावश्यक गोष्टींची आता चढ्या दराने विक्री केली जात असल्याचे ठिकठिकाणी दिसून येत आहे.
कोरोनाने आता दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. दिवसागणिक शेकडो रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात बाधित होत आहेत. याची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू झाले आहेत. सुरुवातीला सकाळी सात ते रात्री आठ ही बाजारपेठ खुली ठेवण्यास दिलेली वेळ बदलून आता शासनाने सकाळी ७ ते ११ ही वेळ नक्की केली आहे. मोठमोठ्या शहरातून तर ही वेळही निर्बंधाचीच आहे.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत परिसरात येणाऱ्या लोटे - घाणेखुंट मिनी बाजारपेठेसह आवाशी, आवाशी - गुणदेफाटा, असगणी फाटा, दाभिळ, लवेल व पीरलोटे येथील छोटे - मोठे व्यावसायिक आता अत्यावश्यक वस्तू वाढीव दराने विकत असल्याची तक्रार महिलांकडून होत आहे. यामध्ये कांदा, बटाटा, सर्व प्रकारचा भाजीपाला, खाद्यपदार्थ, बेकरीतील पदार्थ, थंडपेये व अन्य वस्तूंचा समावेश आहे. अत्यावश्यक सेवेवर अंकुश ठेवणाऱ्या शासनाच्या संबंधित विभागाने लक्ष घालून ग्राहकांची लूट थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.