लांजा : गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोरोनाचे सावट बाप्पाच्या आगमनावर राहणार आहे. त्यामुळे याहीवर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. कोरोनाबरोबरच यावर्षी नैसर्गिक आपत्तींचा सामनाही जनतेला करावा लागत आहे. भाविक गणेशोत्सवाची तयारी करत असतानाच या संकटांमुळे हा सण साधेपणाने साजरा होणार आहे.
युवक - युवतींसाठी शिबिर
रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण युवक व महिलांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ग्रीन सिंधुदुर्ग व ऑर्डिनरी स्कूल ऑफ स्कील्स, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष प्रा. नंदकिशोर परब यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
पूरग्रस्तांना मदत
दापोली : चिपळूण महापुरातील आपद्ग्रस्तांना तालुक्यातील टेटवली येथील सरोदे समाज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष क्षीरसागर, संचालक आप्पा आयरे, लहू साळुंखे, हनुमंत भारदे, प्रल्हाद क्षीरसागर आदी उपस्थित होते.
बालाजी ग्रुपतर्फे मदत
सावर्डे : चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापूर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात हानी झाली आहे. पूरग्रस्तांना सावरण्यासाठी सोलापूरमध्ये बालाजी ग्रुप पुढे आला आहे. या ग्रुपचे राम रेड्डी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपयांची मदत केली आहे. याबद्दल त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले.
कौशल्य स्पर्धा
रत्नागिरी : राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर १७ आणि १८ ऑगस्ट रोजी कौशल्य स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास केंद्र येथे समन्वयक नागेश सितारे यांच्याकडे संपर्क करावा.