रत्नागिरी : एस. टी.च्या सर्व गाड्यांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग यांच्याकरिता राखीव आसनांचे गाजर दाखविले जात असले तरी बरेचदा ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग उभ्याने प्रवास करताना दिसतात. मात्र, त्यांच्यासाठी आरक्षित असलेल्या आसनावर बसलेल्यांमध्ये उठून सौजन्य दाखविण्याची मानसिकता अजूनही दिसत नाही. एस. टी.मध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती यांच्यासाठी दोन आसनांचे आरक्षण असते. त्याचबरोबर काही बसेसमध्ये पत्रकार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासाठीही आरक्षण असते. मूळ स्थानकावर या व्यक्ती चढल्या तर त्यांना या आसनावर बसण्याचा हक्क आहे. मात्र, बरेचदा महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक अथवा अपंग व्यक्ती मूळ स्थानकावर चढली तरीही त्यांना या आसनावर बसू दिले जात नाही. विशेष म्हणजे याबाबत वाहकांचीही मोठ्या प्रमाणावर उदासीनता दिसून येते. महिलांकरिता आरक्षित असलेल्या आसनावर बसलेला पुरूषवर्ग जराही सौजन्य दाखविताना दिसून येत नाही. त्यामुळे आरक्षण असतानाही त्याचे लाभार्थी लांबचा प्रवासही उभ्यानेच करताना दिसून येतात. महिलावर्गही आपल्याला दुरूत्तर ऐकावे लागेल, या भयाने काहीच बोलत नाही. तीच अवस्था अपंग व्यक्ती अथवा ज्येष्ठ नागरिकांबाबत दिसून येते. त्यामुळे एस. टी. महामंडळाची ही आरक्षित जागांची सुविधा केवळ दाखविण्यापुरते गाजर आहे की काय, अशी शंकाही प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
एस. टी.त राखीव आसने नामधारी लाभापासून वंचित : प्रवाशांमध्येही सौजन्य नाही
By admin | Updated: May 15, 2014 00:42 IST