रत्नागिरी : तालुक्यातील चाफेरी येथील बर्म्याचा पऱ्या येथील वळणावर बसचालकाचा ताबा सुटून समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक देऊन अपघात केल्याची घटना बुधवारी, ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमाराला घडली. याप्रकरणी एस. टी. चालक गणेश छगन मानवतकर (रा. रत्नागिरी) यांच्याविरोधात जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी वसंत तुकाराम महाकाळ (वय ६५, रा. कासारी भंडारवाडी, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सकाळी ते ॲक्सेस गाडी (एमएच ०८, एव्ही ०१२१) वरून पत्नीसोबत खंडाळा येथे जात होते. त्याच दरम्यान गणेश मानवतकर हे बस (एमएच १४, बीटी १८३७) घेऊन समोरुन येत होते. ही दोन्ही वाहने बर्म्याचा पऱ्या येथील वळणावर आली असता मानवतकर यांचा एस. टी. वरील ताबा सुटला आणि त्यांनी महाकाळ यांच्या दुचाकीला धडक देत अपघात केला. या अपघातात महाकाळ यांच्या डोक्याला, उजव्या पायाच्या पंजाला, तसेच गुडघ्याला मार लागून दुखापत झाली, तसेच त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक भालचंद्र मयेकर करत आहेत.