रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी सुतारवाडी वळणावर ट्रक आणि एस. टी. बसचा भीषण अपघात झाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. येणाऱ्या अनेक रुग्णवाहिकांमधून रुग्णांना सुखरूपपणे अपघात विभागात दाखल करताना कर्मचारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लोकांची धावपळ उडाली होती. या अपघातामध्ये ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात आलेल्या जखमी व मृतांच्या नातेवाईकांना अश्रू आवरत नव्हते. सकाळी ७.४५ वाजता चिपळूण येथून सुटलेल्या एस. टी. बसला ट्रकने ठोकरल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघाताची वार्ता शहर परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अनेक रत्नागिरीकर बावनदीजवळील अपघातस्थळी पोहोचले. एस. टी. महामंडळाचे अधिकारी, पोलीस यंत्रणा आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी या अपघातानंतर वैद्यकीय सेवा रुग्णांना मिळावी, यासाठी सतर्क झाले होते. रूग्णवाहिकांमधून आणण्यात येणाऱ्या जखमींना स्ट्रेचरवरून नेण्यात येत होते. त्याचवेळी अपघात विभागामध्ये जखमी पुरुष रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना पुरुष शल्य विभागात हलविण्यात आले.यावेळी एस. टी. महामंडळाचे रत्नागिरीचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वाहतूक अधिकारी पी. एस. रसाळ, यंत्र अभियंता के. वाय. फकीर, डेपो मॅनेजर एस. वाय. शेरे, विभागीय वाहतूक अधीक्षक ए. बी. जाधव, सहाय्यक वाहतूक अधीक्षक भारत सावंत, वाहतूक निरीक्षक ए. ए. पाटील, राजेश पाथरे आदी अधिकारी रुग्णांची माहिती घेत होते. या अपघातानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, शहराध्यक्ष संजय पुनसकर, दत्ता देसाई, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद शेरे, उपशहरप्रमुख प्रशांत साळुंखे, भाई जठार, राष्ट्रवादीचे कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, राजू भाटलेकर, यासीन मामू, अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. रुग्णांच्या नातेवाईकांना मोबाइलवरून अपघाताची माहिती या पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर अनेक नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. या अपघातातील जखमी प्रवाशांमध्ये काहींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हाता-पायाला फ्रॅक्चर, डोके, तोंड, छाती, दात, नाकाला दुखापती झाल्या आहेत. काहींना मुका मारही बसलेला आहे. (शहर वार्ताहर)निवळी घाटात भीषण अपघात झाल्याचे वृत्त सकाळी ९.३० वाजता फोनव्दारे कळाल्याबरोबर १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिका अपघातस्थळी तातडीने पाठविण्यात आल्या. जिल्हा शासकीय रूग्णालयातील सर्व वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी यांना सूचना करण्यात आल्या. तातडीने काही बेड तयार करण्यात आले. पुरूष, स्त्री दोन्ही वॉर्डात गरजेनुसार जमिनीवरही बेड तयार करण्यात आले. आलेल्या रूग्णांची तपासणी करून जखमेचे ड्रेसींग करणे, टाके घालणे, सलाईन लावणे रूग्णासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत होत्या. रूग्ण पहिल्या मजल्यावर आणताना अचानक लिफ्टही तांत्रिक दोषामुळे पाच मिनिटे बंद झाली. परंतु तातडीने तीही दुरूस्त करण्यात आली. १४ डॉक्टर रूग्णाच्या सेवेसाठी हजर होते.- डॉ.बी.डी.आरसूळकर, जिल्हा शल्यचिकीत्सक रत्नागिरी.कडवईतून दररोज रत्नागिरीत अप्रेंटशीपकरिता येतो. अचानक ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेमुळे मोठा आवाज झाला. क्षणभर काहीच कळले नाही. मात्र, डोके व तोंड जोरात आपटले. डोक्यातून व तोंडातून रक्तस्त्राव होत होता. एस. टी.तील विदारक दृश्य पाहता आपण बचावलो असल्याबद्दलची खात्री पटली. अन्य जखमी प्रवाशांप्रमाणे मीही अपघातग्रस्त एस. टी.तून बाहेर पडलो. रस्त्यावर आल्यावर खिशातील मोबाईल काढून तातडीने नातेवाईकांना अपघाताची खबर दिली. त्यानंतर अन्य जखमी रूग्णांबरोबर मलाही जिल्हा शासकीय रूणालयात आणले. उपचार सुरू झाले. डोक्यातून झालेला रक्तस्त्राव, तोंडालाही मार बसल्यामुळे दात पडले, तोंडातूनही रक्तस्त्राव खूप झाला. मात्र आपण बचावलो, ही अल्लाहची मेहेरबानी आहे.- नौमान जुवळे, कडवई.
जखमींची तडफड अन् वैद्यकीय अधिकाऱ्यांची धावपळ
By admin | Updated: December 10, 2015 00:57 IST