काजुर्ली येथील रस्ता खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:50+5:302021-06-19T04:21:50+5:30
गुहागर : तालुक्यातील काजुर्ली येथील तीव्र चढातील रस्ता पहिल्याच पावसात खचला आहे. बांधकाम विभागातर्फे या रस्त्याची तातडीने डागडुजी सुरू ...
गुहागर : तालुक्यातील काजुर्ली येथील तीव्र चढातील रस्ता पहिल्याच पावसात खचला आहे. बांधकाम विभागातर्फे या रस्त्याची तातडीने डागडुजी सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर सध्या एका बाजूने वाहतूक सुरू आहे़ गुहागर-रत्नागिरी असा प्रवास करण्यासाठी आबलोली-काजुर्ली-राई-भातगाव मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आबलोली मार्गे काजुर्ली गावात जाण्याआधी तीव्र चढावासह दोन मोठी वळणे लागतात. या मार्गावरील दुसऱ्या वळणानंतर रस्ता खचला आहे. याबाबत बांधकाम विभागाला माहिती मिळताच, शाखा अभियंता महेश नित्सुरे यांच्या देखरेखीखाली काम सुरू करण्यात आले आहे. हा रस्ता पूर्ण हाेईपर्यंत रत्नागिरी येथे जाण्यासाठी चौसाळा मार्गे, तसेच गणेशखिंड सावरदा व चिपळूणमार्गे लांबच्या मार्गाने जावे लागते. थोड्या प्रमाणातच रस्ता खचल्याने गुरुवारपासून रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरू आहे. पहिल्या पावसातच रस्ता खचल्याने, या रस्त्याच्या कामाबाबत साशंकता निर्माण केली जात आहे. हा मार्ग धाेकादायक बनल्याने ताे बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
------------------------------
गुहागर तालुक्यातील काजुर्ली येथील रस्ता खचला असून, जेसीबीच्या साहाय्याने तेथे काम करण्यात येत आहे. (छाया : संकेत गाेयथळे)