चिपळूण : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रिक्टोली गावातील नळपाणी योजनेला विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात येणार असल्याचे आश्वासन ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व त्रिस्तरीय समितीने दिले. या प्रश्नावरून सुरू झालेल्या राजकारणाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.चिपळूण तालुक्यातील रिक्टोली गावातील नळपाणी योजना २०१३ मध्ये मंजूर झाली. परंतु, गावातीलच काही लोकांनी या योजनेबाबत लोकसंख्या, पाणीपट्टी व इतर तांत्रिक मुद्दे उपस्थित करुन योजनेला खीळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे १ कोटी ७ लाख अंदाजपत्रक असलेली योजना मंजूर होऊनही अधांतरी होती. या योजनेवरुन मोठ्या प्रमाणात राजकारण झाले. राजकारणांच्या गोंधळात ही योजना रखडली होती.काहींनी हा विषय प्रतिष्ठेचा केला. त्यामुळे प्रकरण आणखीन चिघळले. मंजूर असलेली योजना होत नाही, म्हणून ग्रामस्थ उपोषणाला बसले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी घटनास्थळाची पाहणी करुन वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सुपूर्द केला. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी आमदार रमेश कदम यांनी याप्रकरणी पाणी पुरवठामंत्री लोणीकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी मंत्रालयात याबाबत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. या उपोषणात शहीद शशांक शिंदे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई शिंदेही सहभागी झाल्या होत्या. लोणीकर यांनी दिलेल्या आश्वासनानुसार भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी आमदार रमेश कदम व रिक्टोलीतील ग्रामस्थांची पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत त्रिस्तरीय समिती नेमून या योजनेचा आढावा घेण्यात आला. या समितीमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह मुख्य सचिव व कार्यकारी अभियंता यांचा समावेश होता. यावेळी झालेल्या बैठकीला कार्यकारी अभियंता संदेश जंगम, उपअभियंता व्यास व अन्य मान्यवर उपस्थित होते. या योजनेचा सारासार आढावा घेऊन सन २०११च्या लोकसंख्येनुसार या गावातील नळपाणी योजनेसाठी ९७ लाखांचा आराखडा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. या नवीन नळपाणी योजनेत ग्रामस्थांना तीन ते साडेतीन हजार रुपये पाणीपट्टी भरावी लागणार आहे. गेल्या दोन वर्षापासून पाण्यासाठी झगडणाऱ्या रिक्टोलीवासियांनी या निर्णयामुळे समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)प्रकृती ढासळली : शहीद शशांक शिंदेच्या मातोश्री उपोषणातमुंबईतील २६/११च्या आतंकवादी हल्ल्यात चिपळूणचे शशांक शिंदे आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई शिंदे यांना गावातील पाण्यासाठी चक्क उपोषणात सहभागी व्हावे लागले. या उपोषणात त्यांची प्रकृतीही ढासळली होती. तरीही याची दखल प्रशासनाने घेतली नव्हती.दोन वर्षे लढा...गेल्या दोन वर्षापासून रिक्टोलीवासीयांचा लढा सुरू होता. मात्र, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे ग्रामस्थांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. पण, या उपोषणाची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. चिपळुणात उपोषण होऊनही प्रशासनाच्या प्रतिनिधींनी भेट घेतली नाही.
रिक्टोलीतील नळपाणी योजनेला अखेर मंजुरी
By admin | Updated: February 29, 2016 00:16 IST