सावर्डे : जिल्हा परिषद सेवानिवृत्तांचे निवृत्तिवेतन अजूनही रखडले आहे. यापूर्वी दरमहा एक तारखेला होणारे हे वेतन मे २०२० पासून अनियमित झाले आहे. त्यामुळे सेवानिवृत्त मेटाकुटीस आले आहे. याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवानिवृत्त संघटनेने सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करण्यास प्रारंभ केला आहे. परंतु अजूनही हे वेतन रखडलेले आहे.
रुद्रानुष्टानची सांगता
रत्नागिरी : येथील ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरातील तृणबिंदूकेश्वरावर श्रावणात सलग एक महिना संततधार रुद्रानुष्ठान सुरू होते. भाद्रपद प्रतिपदेला या संततधार रुद्रानुष्टानची सांगता झाली. कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे पालन करत श्री ग्राम भैरी देवस्थान ट्रस्टचे बारा वाड्यांचे ग्रामस्थ, मानकरी यांच्या सहकार्याने रुद्रानुष्ठान यशस्वी झाले.
सामाजिक संस्थांना मदत
रत्नागिरी : येथील आसमंत बेनओलन्स फाउंडेशन या संस्थेतर्फे दोन सामाजिक संस्थांना प्रत्येकी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली. पुणे येथे कोंढवा येथील स्वामी विवेकानंद उद्यानाजवळ आनंद वृद्धाश्रम (पुणे, कोकण) या संस्थेचा एक महिन्याचा जेवणाचा पूर्ण खर्च आसमंतने उचलला आहे. आबासाहेब नांदुरकर प्रतिष्ठानच्या आधारवड (भोर) या संस्थेला ५० हजार रुपयांची वस्तूरूप मदत देण्यात आली.
झाडी तोडण्याची मागणी
रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी वाढल्याने समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघाताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने झाडी तोडण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.
धोबी घाटाची स्वच्छता
चिपळूण : खेर्डी येथील विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळातर्फे खेर्डी टेरवरोड येथील धोबी घाटाची स्वच्छता करण्यात आली. मंडळातर्फे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. महापुरामुळे धोबी घाटाची चिखलामुळे दुर्दशा झालेली दशरथ दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष शशांक भिंगारे व पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता केली.
खड्डे उखडले
रत्नागिरी : गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने शहरातील रस्त्यांवरील तात्पुरत्या स्वरूपात भरलेले खड्डे पावसाने पुन्हा उखडले आहेत. त्यामुळे जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वाहनचालकांना हे खड्डे पार करताना कसरत करावी लागत आहे.