खेड : कोरोना संकटकाळात शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, या आमदार योगेश कदम यांच्या आवाहनाला खेड शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. खेड शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या इमारतीमध्ये सुरु करण्यात आलेल्या १०० बेड्सने सुसज्ज कोविड केअर सेंटरला भेट देऊन सेवा देण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आमदार योगेश कदम यांनी खेड शहरात शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या इमारतीमध्ये शासनाला सर्व सोयीसुविधांनी युक्त असे १०० बेड्सचे कोविड सेंटर तयार करून दिले. या कोविड सेंटरमध्ये एमबीबीएस व एम. डी. डॉक्टरांची गरज भासणार असून, त्यासाठी डॉ. उपेंद्र तलाठी, डॉ. रियाज मुल्ला यांनी रुग्णांना सेवा देण्याचे मान्य केले आहे. तसे आश्वासन त्यांनी आमदार योगेश कदम यांना दिले आहे.
कोविड आजारातून बरे झाल्यानंतर आमदार योगेश कदम यांनी तत्काळ मतदारसंघात धाव घेऊन तालुका प्रशासनाला गतिमान करण्यासाठी विविध ठिकाणी भेटी दिल्या. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. खेड येथे नव्याने सुरू होणाऱ्या कोविड सेंटरला सर्व अधिकाऱ्यांसह भेट देऊन आढावा घेतला. लवेल येथील कोविड सेंटरला भेट देत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी खासगी व्यवसाय करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोविड काळात प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत आवाहन केले
खेड, दापोली व मंडणगड येथे वाढीव आयसीयू बेड करण्याबाबत आपण आग्रही असून या काळात औषधे, रेमडेसिविर इंजेक्शन, पीपीई किट, सॅनिटायझर, ग्लोव्ह्ज, मास्क कमी पडू देणार नाही, असेही यावेळी आमदार कदम यांनी सांगितले. कोविड लसीबाबत जनतेमध्ये जागृती झालेली असून, लोक लस घेण्यास उत्सुक आहेत. अशावेळी केंद्र शासनाने महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा, अशी विनंतीही त्यांनी केली.