रत्नागिरी : येथील हेल्पिंग हँड्सच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेले रक्तदान शिबिर उत्तम प्रतिसादात पार पडले. शहराच्या जयस्तंभ भागातील गीता भवन येथे बुधवारी (दि. ८) हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी या शिबिराला भेट देऊन कार्यकर्त्यांचे व रक्तदान करणाऱ्यांचे कौतुक केले.
जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर सर्वच रक्तगटांचा तुटवडा जाणवत आहे. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या विविध रुग्णांची संख्या लक्षात घेता, सध्या या रुग्णालयात विविध गटांच्या रक्ताची मागणी वाढली आहे. मात्र, सध्या कोरोनाने बाधित होणाऱ्यांची वाढती संख्या आणि लसीकरण प्रक्रिया याचा परिणाम रक्तसंकलनावर होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीला सध्या रक्तगटांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासू लागला आहे.
त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसिस शस्त्रक्रिया, अपघाती रुग्ण, विविध शस्त्रक्रिया, प्रसुती, थॅलेसिमिया, हिमोफिलियाचे रुग्ण, आर्थिक दुर्बल घटक, ज्येष्ठ नागरिक रुग्ण, आदींना पुरवठा करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे हेल्पिंग हँड्सच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी गीता भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. रक्तदात्यांना हेल्पिंग हँड्सकडूनही प्रमाणपत्र देण्यात आले.
जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी या रक्तदान शिबिराला भेट दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने हेही होते. यावेळी डाॅ. पाटील यांनी हेल्पिंग कार्यकर्त्यांसाेबत विविध समस्यांवर चर्चा केली.