रत्नागिरी : कोरोनाच्या भीषण परिस्थितीत भांबावलेल्या नातेवाईकांच्या मनस्थितीचा गैरफायदा काही खासगी डाॅक्टरांकडून घेतला जात असून, घरी उपचार मिळावेत (होम आयसोलेशन) असे प्रमाणपत्र घेण्यासाठी अगदी ४ हजार ते २५ हजार रुपये अगदी सामान्य लोकांकडून उकळले जात आहेत. मात्र, उपचार कुठलेच दिले जात नसल्याने रूग्ण गंभीर झाला की, हे डाॅक्टर्स हात वर करून दुसरीकडे हलवायला सांगतात. त्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले असल्याने आता त्यांच्या नातेवाईकांमधून संतापाचा उद्रेक व्यक्त होऊ लागला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच जिल्हा महिला रुग्णालयाच्या खाटांची क्षमता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे शासनाने साैम्य किंवा अजिबात लक्षणे नसलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्या रुग्णाला जवळ असलेल्या खासगी डाॅक्टरांचे प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.
मात्र, असे प्रमाणपत्र देणाऱ्या खासगी डाॅक्टरांची संख्या भरमसाठ झाली आहे. सध्या कोरोनाच्या संकटात सामान्य माणूस धास्तावलेला असतानाच यापैकी काही खासगी डाॅक्टरांनी जणू काही धंदाच सुरू केला आहे. काहींनी खासगी कोविड केअर सेंटर उभारले आहे. त्यामुळे रुग्ण किंवा त्याचा नातेवाईक दारात आला की, त्याचा खिसा कापायचाच, हे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे आल्यानंतर त्या रुग्णाची परत अँटिजन चाचणी करायला लावणे, तसेच गरज नसतानाही इतर हानिकारक असलेल्या टेस्ट करायला लावणे, असे अघोरी उपाय सुरू केले असून, चाचणी करायला येणाऱ्यांमध्ये सरसकट पाॅझिटिव्ह येणाऱ्यांची संख्याही या खासगी रुग्णालयांमध्ये भरमसाठ येत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून आता सांगितले जात आहे.
कोरोना रुग्णाला घरी उपचार घ्यायचे असतील तर अलगीकरण प्रमाणपत्रासाठीही ४ हजार ते २५ हजार अशा रकमेची मागणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची कुठलीच दखल घेतली जात नाही. अशा परिस्थितीत रुग्णाची प्रकृती गंभीर किंवा अतिगंभीर झाली की, मग ऐनवेळी रुग्णाला हलवा, असे त्यांच्या नातेवाईकांना सांगितले जाते. अशातून आतापर्यंत अनेक चांगल्या व्यक्तींचे हकनाक बळी गेले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी लोकमतकडे ही कैफियत मांडली आहे. या खासगी डाॅक्टरांची दुकाने जिल्हा प्रशासनाने बंद करावीत, त्यांचे आडिट करावे, अशी मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे.
यापैकी काही नातेवाईकांनी अशा गल्लेभरू खासगी डाॅक्टर्स आणि खासगी सेंटर्सना अद्दल घडविण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत जिल्हा प्रशासनाकडेही लेखी तक्रार करण्याची तयारी सुरू केली आहे.
कोटसाठी
होम आयसोलेशनसाठी प्रमाणपत्र देणाऱ्या डाॅक्टरांनी दर दिवशी रुग्णांचे तापमान, ऑक्सिजन पातळी याची माहिती घेऊन दरदिवशी आरोग्य यंत्रणेला कळवायचे आहे. रुग्ण गंभीर वाटल्यास त्याला अधिक उपचारासाठी कोविड रुग्णालयात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- डाॅ. महेंद्र गावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, रत्नागिरी.