सुभाष कदम : चिपळूण , महाराष्ट्राची भाग्यरेषा अशी ओळख असणाऱ्या कोयना धरणामध्ये सध्या १२.७१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे धरण बांधणीच्या काळात पाण्याखाली गेलेल्या गावातील घरांचे, मंदिरांचे अवशेष तसेच पाषाणाच्या मूर्तींचे आता दर्शन होऊ लागले आहे. यावर्षी पावसाने गुंगारा दिल्यामुळे जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपायला आला तरी पुरेसा पाऊस पडत नाही. नद्या, नाले कोरडे पडले आहेत. अशातच कोयना धरणाची पातळी कमालीची घटली आहे. पुरेसा पाऊस झाला तर कोयना धरणाच्या जलाशयात १०५ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे. हे धरण पुरेसे भरले तर वीजनिर्मिती व पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होते. परंतु, यावर्षी पाऊस लांबल्याने धरणात केवळ १२.७१ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यातच पायथ्याजवळ जलविद्युत प्रकल्पासाठी ३.३० टीएमसी पाणी राखीव करण्यात आले आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावर्षी दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाण्यावर चालणारा कोयना हा राज्यातील एकमेव वीज प्रकल्प आहे. पाऊस पडला नाही तर राज्यात विजेचाही तुटवडा जाणवणार आहे. पावसामुळे समाधानकारक पीकही न आल्याने लोकांना जगणे अशक्य होणार आहे. सध्या हा टप्पा १ जूनपासून बंद करण्यात आला आहे. धरणात पाणी नसल्याने धरण बांधणीच्या काळात अस्तित्त्वात असलेल्या गावातील घरे, मंदिरे, मोठमोठे दगड यांचे अवशेष दिसत आहेत. तेथील लोकांचे श्रध्दास्थान असलेली पाषाणाच्या मूर्ती, शंकराची पिंडी, नंदी व चौथरे स्पष्टपणे दिसत आहेत. भाविक याचे दर्शन घेत आहेत. पाऊस नियमित पडला नाही तर आणखी अडचण होण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे दिलासा मिळाला असला तरी तो किती दिवस राहील, याबाबत त्या भागातील नागरिक शंका व्यक्त करीत आहेत.....महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरात यंदा पाणीटंचाईने इतकी तीव्रता धारण केली की, धरण निर्मितीच्या काळात बुडालेली गावे, तेथील जुन्या अवशेषांसह मंदिरातील मूर्ती, घरांची कामे करताना वापरलेले साहित्य, घराची रचना या कोरड्या पात्रात स्पष्ट दिसत होती. या सर्व गोष्टींद्वारे गावकऱ्यांनी दुष्काळाचे चित्र समोर उभे केले असतानाच वरूणराजा बरसल्याने पाणीटंचाईचे संकट किमान टळल्यासारखे दिसले. यानिमित्ताने १९६२च्या धरणग्रस्तांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पुरातन मंदिरातील मूर्ती आणि शिवपिंडीचे दर्शन झाले. त्या पिंडीचे दर्शन घेऊन या भागातील गावकऱ्यांनी पावसासाठी प्रार्थना केली.
कोयना धरणात अवशेष सापडले
By admin | Updated: July 12, 2014 00:33 IST