कुवे : रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित विषयांबाबत पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा संघटनेच्यावतीने प्रभारी शिक्षणाधिकारी अनिलकुमार कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी भारती संसारे यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन सादर करण्यात आले.जिल्ह्यातील वस्तीशाळा शिक्षकांना नियुक्ती देऊन त्यांना नियमीत वेतन सुरु करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत मार्च महिन्यात शासन निर्णय होऊनही कार्यवाही करण्यात आली नसल्याने आज १० ते १५ वर्षे तुटपूंज्या मानधनावर काम करणारे वस्तीशाळा शिक्षक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दुर्गम भागात सेवा बजावत आहेत. जिल्ह्यात एकाच पदावर सलग २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ देताना काही ठराविक तालुक्यातील शिक्षकांनाच हा लाभ दिला जात असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. याबाबत सर्व तालुक्यातून माहिती संकलीत करुन पात्र शिक्षकांना याचा लाभ दिला जाईल, असे सांगण्यात आले.जिल्ह्यात नव्याने पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती स्वीकारलेल्या शिक्षकांना नियमीत किंवा पत्राद्वारे बी. एड. करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाने द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत रजा तसेच परवानगीबाबत सर्व तालुक्यांना मार्गदर्शन करण्याचे मान्य करण्यात आले. जिल्ह्यातील शिक्षकांना यापूर्वी देण्यात आलेली सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम, चट्टोपाध्याय वेतनश्रेणी याची विशेष वेतनपथकाद्वारे तपासणी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. याबाबत लवकरच प्रत्येक तालुक्याला तपासणी पथक पाठवून वेतन पडताळणी करणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील सेमी इंग्रजी सुरु करण्यात आलेल्या शाळांची आस्थापना करताना प्रत्येक तुकडीला स्वतंत्र शिक्षक देण्यात यावा, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. जिल्ह्यातील मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक यांचे समायोजन करताना जास्तीत जास्त शिक्षकांना त्यांचे सध्याचे वय, आजारपण, अपंगत्व आदी बाबींचा विचार करुन शक्य तेवढ्या सोयीच्या ठिकाणी नेमणूक देण्यात यावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.या भेटीप्रसंगी पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस उदय शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत पावसकर, उपाध्यक्ष उल्हास पटवर्धन, अशोक भालेकर, संतोष पेवेकर, संजय डांगे, नरेश सावंत, दीपक माळी, संजय विश्वासराव, प्रकाश कामेरकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
वस्तीशाळा शिक्षकांना नियमीत वेतनाची मागणी
By admin | Updated: August 11, 2014 00:11 IST