विनोद पवार - राजापूर -विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत आली असून, सर्वच उमेदवार आपापल्या प्रचारात गुंतलेले दिसून येत आहे. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी राजापूर विधानसभा मतदारसंघात नेत्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्याऐवजी वैयक्तिक गाठीभेटीवर भर देण्यात आला आहे. हीच रणनिती सर्व उमेदवारांनी अवलंबिली आहे. शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसनेही छुप्या पध्दतीच्या प्रचाराचा अवलंब केला असून, राष्ट्रवादीने प्रचाराची राळ उठवली आहे. भाजपाचा प्रचार मात्र, संघ केंद्रित झाला असून, आपली ताकद कमी असल्याचे माहीत असतानाही नियोजनबद्ध प्रचार सुरु आहे.राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघ गेली अनेक वर्षे शिवसेनेचे बालेकिल्ला राहिला असून, काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांनी आपली प्रचारासाठीची ताकद लांजा तालुक्यावर केंद्रित केली आहे. या विधानसभा मतदारसंघातील विजयाची गणिते यावेळी लांजा तालुक्यावरच जास्त प्रमाणात अवलंबून राहणार आहेत. काँग्रेसने स्थानिक उमेदवाराचा प्रश्न सोडवताना लांजा तालुक्यातील राजन देसाई यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे लांजा तालुक्यातील जास्तीत जास्त मते मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीचे अजित यशवंतरावही लांजा तालुक्यातीलच आहेत. त्यामुळे अगोदरपासून नेतृत्व मिळवण्यासाठी धडपडणारे लांजावासीय आता प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कोणाच्या पारड्यात मते टाकणार, यावरच सर्व यशापयश अवलंबून राहणार आहे. पहिल्यापासूनच या संपूर्ण मतदारसंघावर सेनेचे वर्चस्व राहिल्यामुळे लांजा तालुक्यातील सेनेची मते किती प्रमाणात विभागली जातात, यावर राजन साळवी यांचेही गणित विसंबून राहणार असल्याचे मानले जाते. मात्र, ही शक्यता अगोदरच लक्षात घेऊन शिवसेनेने लांजा तालुक्याच्या पदरात जिल्हा परिषद अध्यक्षपद घालून आपली मते वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप यावेळी किती मते मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी भाजपने इतरांपेक्षा वेगळी प्रचार पध्दत वापरुन आपले वेगळेपण सिध्द करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी कधीही प्रचारात न येणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्र्ता या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारात आला आहे. अतिशय गुप्त पध्दतीने भाजपचा प्रचार सुरु आहे. आजपर्यंत इतर राजकीय पक्षांनी ज्या ज्या घटकांंकडे दुर्लक्ष केले त्या बाबी हेरुन भाजपने आपला प्रचार सुरु ठेवला आहे. आजच्या घडीला भाजपची ताकद दिसून येत नसली तरी कोकण विकासासाठी भाजपच्या संजय यादवराव यांनी आजपर्यंत केलेले काम येथील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपबरोबरच संघांच्या कार्यकर्त्यांनी सर्व उमेदवारांच्या अगोदर केल्यामुळे प्रमुख काँग्रेस आणि शिवसेना उमेदवारांच्या मताधिक्याबरोबरच विजयावर परिणाम करणारे ठरत असल्यामुळे दोन्ही गोटात चांगलीच खळबळ माजली आहे.
राजापूरमध्ये वैयक्तिक गाठीभेटीवर भर
By admin | Updated: October 10, 2014 23:04 IST