शोभना कांबळे -रत्नागिरी -देवस्थानांची देखभाल तसेच दुरूस्तीचा प्रश्न वाढू लागल्याने शासनाने आता देवस्थान इनाम खालसा करून या जमिनी ज्यांनी आतापर्यंत सांभाळल्या आहेत, त्या वहिवाटदारांना मालकी हक्काने देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १३८ गावातील २०३ देवस्थानच्या इनाम जमिनींवर वहिवाटदारांना मालकी हक्क मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पूर्वी राजे महाराजे, सरंजाम यांच्याकडून देवस्थानासाठी काही जमिनी इनाम दिल्या होत्या. मात्र, अनेक वर्षे उलटल्याने या इनाम जमिनींवर असलेल्या अनेक वर्षांच्या जुन्या देवस्थानांच्या बांधकामांची देखभाल आणि दुरूस्तीचा प्रश्न सर्वच राज्यांमध्ये ऐरणीवर आला आहे. शहरी व ग्रामीण भागातील अनेक जमिनींची नोंद ही देवस्थान इनाम म्हणून करण्यात आली आहे. या सर्व जमिनी वर्ग - ३ मध्ये मोडत असल्याने त्याचा वापर करणाऱ्या वहिवाटदारांना घर दुरूस्ती व अन्य कारणांसाठी वारंवार परवानगी घ्यावी लागते. काहीवेळा तर त्यांच्या जमिनीवर अतिक्रमणही होते. हे निदर्शनास आल्याने हे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने गुजरातमध्ये या इनाम जमिनीवर वहिवाट असलेल्यांनाच या जमिनी मालकी हक्काने देण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रातही हा निर्णय घेण्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेत केली आहे. मात्र, मालकी हक्काने जमिनी देताना त्या ज्या कारणासाठी दिल्या आहेत, त्याच कारणासाठी त्याचा वापर होणार आहे का, हेही पाहिले जाणार आहे. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. असा निर्णय झाल्यास जिल्ह्यातील १३८ गावांतील २०३ देवस्थानांच्या इनाम जमिनी, त्या जमिनीवर वहिवाट असलेल्यांच्या मालकी हक्काच्या होण्यास मदत होणार आहे. या निर्णयावर शासनाने अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. कोकणात अनेक ठिकाणी देवस्थानच्या जमिनींबाबत काही चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी निर्णय प्रलंबित आहेत. काहींनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र, या निर्णयावर अंतिम स्वरूप न आल्याने अनेकांनी याबाबत वाट पहाणेच पसंत केले आहे. या प्रकरणात अनेक वर्षे न्याय मिळत नसल्याने आता कालावधी लोटल्यानंतर काही महत्वाचा निर्णय सरकार दरबारी होत आहे.
इनाम जमिनी वहिवाटदारांच्या!
By admin | Updated: August 10, 2015 00:39 IST