शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ रुजवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:27 IST

सृष्टीमध्ये जन्म, अस्तित्व आणि मृत्यू या तीनच शाश्वत गोष्टी असाव्यात कदाचित. प्राचीन भारतीय मान्यतेनुसार जन्मदाता, पालनकर्ता आणि संहारकर्ता अशा ...

सृष्टीमध्ये जन्म, अस्तित्व आणि मृत्यू या तीनच शाश्वत गोष्टी असाव्यात कदाचित. प्राचीन भारतीय मान्यतेनुसार जन्मदाता, पालनकर्ता आणि संहारकर्ता अशा तीन शक्ती सृष्टीचे संचलन करतात. त्यात काहीच अतार्किक नाही. आपल्या नजरेसमोर हा खेळ सतत चाललेला असतो. यातल्या जन्म आणि मृत्यू या क्षणिक तर अस्तित्व ही त्या तुलनेत अधिक काळ चालणारी प्रक्रिया आहे. जन्म सुखकारक तर मृत्यू दुःखद हे स्वाभाविक आहे. अस्तित्वात सुख आणि दुःख यांचा सतत पाठशिवणीचा खेळ चालू असतो. पण अस्तित्व हीच नव्या जन्माची कूस असते. त्यामुळे हे चक्र अविरत चालू राहण्यासाठी अस्तित्व किती आणि कसं आहे याला मोठं महत्त्व येतं.

काही दिवसांपूर्वी चांदफळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका खूप वैशिष्ट्यपूर्ण झाडाची एका देवराईत कत्तल झालेली पाहून व्यथित अंतःकरणाने त्याची गोष्ट मी लिहिली होती. आणि आज त्याच झाडाच्या बिया रुजण्याची आनंददायी गोष्ट मला सांगायची आहे. खरं तर कोणतीच झाडं तोडू नयेत या भाबड्या अंधविश्वासातून बाहेर पडल्याला खूप दिवस झाले. झाडं लावावी आणि त्यांच्या उपयोगासाठी ती तोडावीच असं सध्या माझं मत आहे. संन्यास घेतला तरच झाडं तोडण्यापासून पूर्णपणे अलिप्त राहता येईल एवढं खरं.

मात्र काही झाडं विशिष्ट असतात, अद्वितीय असतात. अनेक झाडे निसर्गतःच दुर्मिळ असतात. ती सहसा सर्वत्र आढळून येत नाहीत. त्याचप्रमाणे काही झाडं प्रदेशनिष्ठ असतात. अर्थात ती एखाद्या ठराविक प्रदेशातच आढळतात. अशा झाडांचं दर्शन दुर्मीळ असतं. जगात सर्वात अजस्त्र वाढणारी म्हणून प्रसिद्ध असलेली महाकाय रेडवूड झाडं केवळ उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यालगत असलेल्या सिएरा नेवाडा पर्वतराजीत आढळतात. त्यांना आपण कधी आणि कसं बघायचं? त्यातल्या एकेका झाडाच्या शेकडो वर्षांच्या अस्तित्वात त्याने काय काय अनुभवलं असावं बरं? कविकल्पना अशी आहे की अशा एखाद्या झाडाखाली बसून डोळे मिटले तर त्याचे श्वास तो सगळा अनुभव आपल्या श्वासात मिसळून देतील.

अशाच प्रकारची अनेक दुर्मीळ आणि प्रदेशनिष्ठ झाडं आपल्या सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आढळतात. त्यापैकीच एक हे चांदफळ. याचं शास्त्रीय नाव आहे Antiaris toxicaria. याच्या खोडातून निघणाऱ्या चिकाला जहाल विषारीपणा असतो; त्यामुळे toxicaria. जंगलाच्या आच्छादनातून वर उंच डोकावणारी जी मोजकी झाडं असतात त्यात याचा समावेश होतो. याचा सरळसोट बुंधा सहज शंभर सव्वाशे फुटापर्यंत असतो. याच्या सानिध्यात बसल्यावर कुणा बुजुर्ग व्यक्तिमत्त्वाच्या सावलीत असल्याची भावना होते. कधी काळी ही झाडे बऱ्यापैकी संख्येत असावीत. पण आज अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच शिल्लक आहेत.

माझे जुने सहकारी अमित मिरगळ यांनी काही वर्षांपूर्वी या झाडाचा अभ्यास करून पीएच.डी केली. या झाडांची नैसर्गिक रुजवण होत नसल्याची माहिती त्यातून पुढे आली. असं होत राहिलं तर आत्ता जी झाडं आहेत ती आपल्या मरणाने मेली काय किंवा माणसांनी तोडली काय, एकच परिणाम होणार. हे झाड नामशेष होणार. आणि हे असं एकच झाड नाही: काळा धूप, पांढरा धूप, शिडम, मायफळ, वट अशी अनेक आहेत. या सगळ्या बुजुर्ग पण दुर्मीळ वृक्षांचं अस्तित्व कोणतीही निशाणी शिल्लक न ठेवता मिटून जाणार आहे.

वाघ नामशेष होऊ नये म्हणून दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च करणाऱ्या आपल्या देशात वाघाइतक्याच संकटग्रस्त असलेल्या या झाडांची दखल सुद्धा घेतली जात नाही. पण काही भारावलेली माणसं अशा कामांना वाहून घेतात. माझा मित्र (एके काळचा विद्यार्थी) मिलिंद पाटील कुडाळमध्ये आपल्या परीने वृक्ष संवर्धनाचे काम करतोय. त्याच्या नर्सरीत त्याने अनेक दुर्मीळ वृक्षांची रोपे तयार करण्याचे मिशन हाती घेतलंय. त्यासाठी तो अक्षरशः वणवण भटकतो, लोकांना भेटतो, झाडं शोधून काढतो, त्यांच्या बिया गोळा करतो, त्या रुजवतो, संशोधकांशी चर्चा करतो. त्याच्या या एकंदर सर्व उपद्व्यापाला एक शास्त्रीय बैठक आहे. जंगलाचं अंतरंग समजून घेऊन त्यावर आधारित जंगल पुनर्स्थापनेचे प्रयोग करण्याचं तो योजतो आहे. सह्याद्रीच्या जंगलाची राखण करणाऱ्या या वृक्षरुपी एकांड्या शिलेदारांना रसद पुरविण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पण त्याला जाणीव आहे की हे काम एकट्याने करण्याचं नाही.

मग त्याने ठरवलं की वनविभागाला आपल्या कामाशी जोडून घ्यायचं. कुडाळचे नवीन वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांच्याशी चर्चा करून आणि त्यांच्या वरिष्ठांच्या मान्यतेने त्याने एक कार्यक्रम आखला. यात त्याने सर्व वनरक्षकांना सामील करून घेतलं, त्यांना एक प्रेझेंटेशन दिलं. त्यात सिंधुदुर्गात आढळणाऱ्या दुर्मीळ झाडांची ओळख कशी पटवायची, त्यांची ठिकाणं कशी शोधायची, त्यांचं बी कधी गोळा करायचं ते सगळं दाखवलं. त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चेचा धागा पुढे नेण्यासाठी एक समाज माध्यमाचा ग्रुप बनवला. आणि मग सुरू झाली प्रत्यक्ष मोहीम.

अनेक वनरक्षकांनी आपली इतर कामे सांभाळून या कामात देखील रस घेतला. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू लागलं. दुर्मीळ झाडांची ठिकाणं मिळू लागली. आणि एके दिवशी जयदत्त आरगडे या वनरक्षकाला अक्षरशः घबाड मिळालं. एक उंच अवाढव्य झाड आणि त्याखाली पडलेला फळांचा सडा. त्यांनी फोटो पाठवले, ओळख पटवली आणि बी गोळा केलं. ते होतं आपलं चांदफळ. आज वनविभागाच्या चाफेली नर्सरीमध्ये चांदफळाच्या एक हजार बिया रुजताहेत. ही रोपं मोठी झाली की त्यातली किती कुठे - जंगलात, देवराईत, बागेत, शेतात - लावायची याचं देखील त्यांनी नियोजन केलं आहे.

काही वर्षांनी चांदफळाची अनेक झाडं जोमाने जंगलाचं छत भेदून आकाशाच्या काळजात शिरतील. या झाडाचं जन्म मृत्यूचं चक्र आता पुन्हा फिरायला लागेल. आणि त्या देवराईत तुकडे होऊन पडलेल्या वृक्षाचं दुःख हलकं होईल. आता गरज आहे ती ही मोहीम इतर ठिकाणी राबवण्याची. माणसांचं जग निसर्गावर उलटलेलं असताना जन्मदाता आणि पालनकर्ता या दैवी भूमिका वठवणारे मिलिंद, जयदत्त, अमित आणि अमृत मला तरी सिंधुदुर्गातील दशावतारी कलाकारच वाटतात. त्यांना माझे नमन.

~विनायक पाटील, दापाेली