अडरे : आपल्या जिवाची पर्वा न करता एस. टी. महामंडळाची साडेसात लाखांची रोकड सुखरूप ठेवून स्वतःसह अन्य सात जणांचा जीव वाचविणाऱ्या आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांची कामगिरी खरोखरच उल्लेखनीय आहे. सरकारी सेवेत राजेशिर्के यांच्यासारखे कर्तबगार अधिकारी असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी कौतुक केले.
खास सातारा येथून सुहास राजेशिर्के चिपळूण येथे रणजित राजेशिर्के यांचा सत्कार करणे आणि पूरग्रस्त कुटुंबांना मदत करण्याकरिता चिपळूण दौऱ्यावर आले होते.
दि. २२ जुलै रोजी आलेल्या महापुरात आपल्या जिवाजी पर्वा न करता एस. टी. महामंडळाची सुमारे साडेसात लाखांची रोकड तब्बल ९ तास एसटीच्या टपावर घेऊन बसून मालमत्ता सुरक्षित ठेवल्याबद्दल चिपळूण आगाराचे आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांचा सातारा नगरपालिकेचे नगरसेवक तथा वेहेळे गावचे सुपुत्र सुहास राजेशिर्के यांनी चिपळूण आगारप्रमुख कार्यालयात जाहीर सत्कार केला.
यावेळी आगार व्यवस्थापक रणजित चंद्रकांत राजेशिर्के, वाहन परीक्षक संजय केशव रसाळ, वाहतूक नियंत्रक संजय पुंडलिक मोहिते, सुरक्षारक्षक सचिन साळवी, वाहक गणेश पंडित, चालक शशिकांत पांडुरंग भोजने, चालक भगवान यशवंत यांचाही सुहास राजेशिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सतीश राजेशिर्के, दिगदेश राजेशिर्के, मंदार राजेशिर्के आणि चिपळूण आगारातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. रणजित राजेशिर्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सुहास राजेशिर्के यांनी केलेल्या विशेष सत्काराने कर्मचारी भारावून गेले होते.
--------------------
अतिवृष्टीच्या काळात जिवाची पर्वा न करता साडेसात लाखांची राेकड पुरापासून वाचविणाऱ्या आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांचा नगरसेवक सुहास राजेशिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.