लाेकमत न्यूज नेटवर्क
लांजा : काेराेनामुळे आई-वडिलांचे निधन झालेल्या बालकांचे पालकत्व घेऊन त्यांना आधार देण्याचे काम राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जीवलग टीमकडून केले जात आहे. लांजा तालुक्यातील कुर्णे येथील पालकत्व घेतलेल्या मुलांसमवेत रक्षाबंधन साजरी केली.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. ज्या मुलांच्या आई-वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या मुलाचे जीवलग टीमकडून पालकत्व घेण्यात आले आहे. लांजा तालुक्यातील कुर्णे येथील रमेश दाभोळकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे त्यांची तीन मुले अनाथ झाली आहेत. त्या मुलांची जबाबदारी लांजातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवलग टीमने घेतली आहे. रक्षाबंधनाचे औचित्य साधून युवक व युवतींनी या मुलांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरी केली. यावेळी या मुलांना कपडे व खाऊ देण्यात आला. रक्षाबंधन साजरी करताना या मुलांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद पाहायला मिळत हाेता. यावेळी महिला तालुकाध्यक्ष स्वप्ना सावंत, सामाजिक न्याय सेल माजी तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे, युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे, युवती तालुकाध्यक्षा शीतल शिंदे, शहर युवती अध्यक्षा प्रतीक्षा गुरव व किरण गुरव उपस्थित होते.