रत्नागिरी : जून महिन्यात गायब झालेल्या पावसाने श्रावणाच्या प्रारंभापासूनच जोर धरला आहे. आज, बुधवारचे सकाळचे सत्र पूर्ण कोरडे गेल्यानंतर दुपारच्या सत्रात काही जोरदार सरी कोसळल्याने जूनचा राहिलेला कोटा आता तो पूर्ण करणार, असे चित्र दिसत आहे. दरम्यान, खेडमध्ये चोरद नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.श्रावण सुरू होताच पावसाने सोमवारपासून पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. पाऊस शांतपणे पडत असला तरी वाऱ्याचा जोर अधिक असल्याने जिल्ह्यात पडझडीच्या घटना घडत आहेत. आज दुपारपर्यंत मळभ दाटले असले तरी पाऊस पडला नव्हता. दुपारच्या सत्रात मात्र पावसाने जोर धरला. सायंकाळच्या सत्रात शांत झालेला पाऊस रात्री पुन्हा जोरदार कोसळला.या पावसात संगमेश्वर तालुक्यात एका घराचे ९०० रुपयांचे नुकसान झाले असून, मंडणगड येथे एका घराचे ४,१०० रुपयांचे नुकसान झाले आहे. देवरुख येथे २८ रोजी एका गोठ्याचे १ लाख ३९ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले असून, एक गाय आणि एक बैल मृत झाल्याने ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय एका घराचे ५३०० रुपयांचे किरकोळ नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरीत पावसाचा जोर; चोरद नदीला पूर
By admin | Updated: July 30, 2014 23:47 IST