रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाची सुरुवात झाली आहे. रात्रीपासून जोर वाढला असून, शुक्रवारी सकाळीही तो कायम होता. त्यामुळे आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम रहाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हवामान खात्याकडूनही १२ जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात पाठ फिरवलेल्या पावसाने जिल्ह्यात गुरुवारपासून पडण्यास सुरुवात केली आहे. सुमारे पंधरा दिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बळीराजा चिंतेत होता. परंतु गुरुवारपासून पुन्हा पावसाचे ‘कम बॅक’ झाले आहे. अधूनमधून जोरदार सरी काेसळत असल्याने आता गारवाही जाणवू लागला आहे.
गुरुवारी सकाळपासूनच पावसाने चांगली गती घेतली आहे. दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची जोरदार सुरुवात झाली. त्यानंतर ११ वाजल्यापासून थोडी उसंत घेतली होती. दुपारनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सायंकाळीही पुन्हा वाढ झाली. दिवसभर पावसाचे वातावरण होते.
दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४३७.७० मिलिमीटर (सरासरी ४८.६३ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली आहे. मात्र, कुठेही पडझडीच्या घटनांची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झालेली नाही.
भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार ९ ते १२ जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.