चिपळूण : जुलै महिना सुरु झाला तरी पावसाचा पत्ता नसल्याने आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिपळूण शहर परिसरातील सार्वजनिक विहिरींची आता साफसफाई करुन त्या पाण्यासाठी उपयोगात आणण्याचा प्रस्ताव उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे सादर केला आहे. कोयनेच्या पाण्यावर चिपळूणचे जीवन अवलंबून आहे. नळपाणी योजनेद्वारे शहर व परिसराला नगरपरिषद पाणीपुरवठा विभागातर्फे सकाळ व दुपार अशा दोन वेळेत पाणीपुरवठा केला जातो. सुधारित नळपाणी योजना सुरु होण्यास अद्याप तीन ते चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात पाऊस सुरु होतो. यावर्षी जुलै महिना सुरु झाला तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये हाल होत आहेत. शहराची लोकसंख्या ५५ हजारच्या आसपास आहे. कोयना धरणाच्या पाण्यातही काही वेळा कपात केली जात असल्याने शहर व परिसराला पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय येत आहे. अजून काही दिवस पाऊस पडला नाही तर कोयनेचे पाणीही बंद होण्याची शक्यता आहे. पाऊस पडला नाही तर पाणीटंचाईही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने चिपळूण शहर व परिसरातील अंदाजे २४ सार्वजनिक विहिरींची साफसफाई केल्यास हे पाणी वापरण्यास तेथील नागरिकांना सोयीचे ठरेल. यासाठी उपनगराध्यक्ष शाह यांनी शहर व परिसरातील सार्वजनिक विहिरी साफसफाई करण्याचा प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवला आहे. टेंडर प्रक्रियेद्वारे या विहिरी साफ केल्या जाणार आहेत. त्यानुषंगाने सार्वजनिक विहिरींची आता साफसफाई होणार आहे. यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र ही प्रतिक्षा फार काळ करावी लागू नये अशी अपेक्षा शहरातून व्यक्त केली जात आहे.चिपळूणमध्ये २४ सार्वजनिक विहिरी आहेत. या सर्व विहिरींची स्वच्छता झाल्यास तेथे मुबलक पाणी उपलब्ध होईल व त्यातून पाणी टंचाईवर मात करता येणे शक्य होईल (वार्ताहर)
सार्वजनिक विहिरी स्वच्छ
By admin | Updated: July 5, 2014 00:00 IST