लांजा : फेसबुकवर बौद्ध व मुस्लीम समाजाच्या भावनांचा अवमान करणारे लिखाण करणाऱ्या प्रवृत्तीचा लांजा तालुक्यातील शिवरायांचे मावळे यांच्यातर्फे निषेध करण्यात आला़ हे लिखाण करणाऱ्यांवर कारवाई हाेण्याची मागणी करण्यात आली असून, त्याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना देण्यासाठी लांजाचे तहसीलदार समाधान यांच्याकडे देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, फेसबुक अकाउंटवरून विहंग कुवळेकर या तरुणाने आपल्या मित्राबरोबर फेसबुक चॅटिंग करताना बौद्ध व मुस्लीम समाज बांधवांच्या भावनांचा अवमान होईल असे लिखाण केले. हे भारतीय लोकशाहीत अशोभनीय आहे. सार्वभौम धर्मनिरपेक्ष भारत देशामध्ये एकता, बंधुता आणि समानता ही मूल्ये रुजत असताना, कोणत्याही समाजाच्या भावना दुखावता कामा नयेत, असे आम्हा लांजा तालुक्यातील शिवरायांच्या मावळे परिवाराला वाटत असल्याचे म्हटले आहे़ समाजाच्या भावनांचा अवमान व अपमान केल्याबद्दल या घटनेचा निषेध करत असल्याचे म्हटले आहे. तालुक्यामध्ये अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित तरुणावर योग्य ती कायदेशीर कारवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे़ निवेदन सादर करताना संतोष जाधव, संजय खानविलकर, दाजी गडहिरे, बाबा धावणे, नितीन शेट्ये, सोहेल, शाहरूख नेवरेकर, दिलीप कांबळे व इतर मावळे उपस्थित होते.
------------------------
समाजाचा अवमान करणारे लिखाण करणाऱ्या तरुणावर याेग्य ती कारवाई करण्यासाठी लांजाचे तहसीलदार समाधान गायकवाड यांच्याकडे निवेदन देण्यात आले.