दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये वनशास्त्र महाविद्यालय येथे गेल्या दोन वर्षांपासून बांबू प्रजातीचा अगरबत्ती निर्मितीसाठी संशोधन प्रकल्प सुरू आहे. या संशोधनाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत बांबूपासून आठ अगरबत्ती निर्मितीचे प्रकल्प राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
वृक्ष कोसळून नुकसान
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे बौद्धवाडी येथे १०० वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड पांडुरंग धर्माजी गमरे यांच्या घरावर कोसळले. त्यामुळे गमरे यांच्या छपराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तलाठी घाग यांनी पंचनामा करुन अहवाल देवरुख तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
सेवाभावी उपक्रम
दापोली : शिवसाई मित्रमंडळ, दाभीळ पाटीवाडी यांच्यातर्फे गणेशोत्सवकाळात सेवाभावी उपक्रम राबविले जात आहेत. या मंडळाने गणेशोत्सवापूर्वी आपली वाडी व तिच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविले. सार्वजनिक विहिरी, पिण्याच्या पाण्याच्या टाकी तसेच त्या परिसरातील स्वच्छता केली.
निवृत्ती वेतन रखडले
सावर्डे : जिल्हा परिषद सेवानिवृत्तांचे निवृत्ती वेतन अजूनही रखडले आहे. यापूर्वी दरमहा एक तारखेला होणारे हे वेतन मे २०२० पासून अनियमित झाले आहे. त्यामुळे सेवानिवृत्त मेटाकुटीस आले आहे. याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवानिवृत्त संघटनेने सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करण्यास प्रारंभ केला आहे. परंतु अजूनही हे वेतन रखडलेले आहे.
खड्डे उखडले
रत्नागिरी : गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने शहरातील रस्त्यांवरील तात्पुरत्या स्वरुपात भरलेले खड्डे पावसाने पुन्हा उखडले आहेत. त्यामुळे जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वाहनचालकांना हे खड्डे पार करताना कसरत करावी लागत आहे.