लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथील जितेंद्र जोशी बारमाही शेती करीत असून, शेतात सातत्याने नवनवीन प्रयोग करीत आहेत. कोकणच्या लाल मातीत गहू, सूर्यफुलाचे उत्पादन चांगले होते, हे त्यांनी सिध्द केले आहे. गेली दोन वर्षे कोथिंबीर पिकातून उत्पन्न मिळवित आहेत.
पावसाळ्यात २२ गुंठे क्षेत्रावर ते भाताचे उत्पादन घेत असून, भात काढल्यानंतर जमिनीची वर्गवारी करून कुळीथ, पावटा, मूग, मटकी लागवड करतात. याशिवाय त्यांनी ८० नारळ, ४०० सुपारी, ६० आंबा व ४० काजू लागवड करून बागायती उत्पन्न घेत आहेत. दरवर्षी दोन क्विंटल सुपारीचे उत्पन्न प्राप्त होत आहे. वर्षाला एक हजार नारळ आणि साधारणत: २५० ते ३०० किलो काजूबी मिळवित आहेत. आंबा मात्र ते मुंबई येथे विक्रीसाठी पाठवतात, शिवाय खासगी विक्रीतूनही उत्पन्न मिळवित आहेत.
शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांच्याकडे सहा जनावरे आहेत. नांगरणीसाठी एक बैल जोडी असून, चार गायी व म्हशींचा सांभाळ केला आहे. दूध - दुभते प्राप्त होत असून, शेण व गोमूत्राचा वापर करून कंपोस्ट खत व जीवामृत तयार करून शेतीसाठी त्याचा वापर करीत आहेत. दुभत्या गुरांसाठी बारमाही ओला चारा उपलब्ध व्हावा, यासाठी एक गुंठ्यावर ते मका लागवड करतात.
उन्हाळी शेतीमध्ये त्यांनी यावर्षी दोन गुंठे क्षेत्रावर गहू लागवड केली होती. शेणखत व युरिया खताचा वापर केला होता. कोकणच्या लाल मातीत गहू चांगला होतो, ते त्यांनी सिध्द केले. याशिवाय एक गुंठे क्षेत्रात त्यांनी सूर्यफूल लागवड केली होती. एका गुंठ्यात त्यांना ७५ किलो बी प्राप्त झाले असून, त्यापासून त्यांनी घाण्यावरून तेल काढून घेतले. २२ लीटर तेल त्यांना प्राप्त झाले. त्यामुळे यावर्षी त्यांनी सूर्यफुलाची लागवड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय गेली दोन वर्षे कोथिंबीर लागवड करीत आहेत. गुंठ्याला दहा हजारप्रमाणे उत्पन्न प्राप्त होत आहे. चांगल्या उत्पन्नामुळे उन्हाळ्यात त्यांनी दोन गुंठ्यावर लागवड वाढविल्याने त्यांना भरघोस उत्पन्न प्राप्त झाले.
बारमाही शेती
पाण्याची उपलब्धता असेल तर कोकणातही बारमाही शेती करता येते. मात्र, त्यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. सुपारी, नारळ, आंबा, काजू बागायतीतून उत्तम दर्जाचे पीक मिळविण्यासाठी खताची मात्रा, कीटकनाशक फवारणी याचे नियोजन आवश्यक आहे. कोथिंबीर, सूर्यफूल ही नगदी पिके असून, उत्पन्न मिळवून देणारी आहेत. सूर्यफुलाचे पीक चांगल्या दर्जाचे घेता येते, हे जितेंद्र जोशी यांनी सिध्द केले आहे. कोथिंबीरीला चांगली मागणी असल्याने उन्हाळ्यात खप होतो. गुंठ्याला दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळते, हे जोशी यांनी सिध्द केले असून, भविष्यात लागवड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी विभागाचे ते वेळोवेळी मार्गदर्शन घेत आहेत.