चिपळूण : ठेकेदारामार्फत सेवातत्त्वावर जे कामगार काम करतात, त्यांची ठेकेदारांकडून पिळवणूक होते. त्या कामगारांना शासनाच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळत नाही. या प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी कामगारांना आॅनलाईन वेतन देण्याची सूचना ठेकेदाराला देण्यात यावी, असे आज (गुरुवारी) झालेल्या नगर पालिकेच्या विशेष सभेत ठरले. चिपळूण नगर परिषद कौन्सिलची विशेष सभा आज सायंकाळी श्रावणशेठ दळी सभागृहात नगराध्यक्ष रिहाना बिजले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विविध १९ विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेच्या सुरुवातीला महाराष्ट्र हायस्कूल ते स्वामी मठ रस्त्याकरिता आवश्यक निधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मिळण्याबाबत आलेल्या रिपोर्टवर निर्णय घेताना नगरसेवक राजू देवळेकर यांनी यापूर्वी नगरपालिकेचा या रस्त्यावर झालेल्या खर्चाची माहिती विचारली. त्याबाबत नगराध्यक्ष बिजले व गटनेते राजू कदम यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. बाजार पुलाबाबत पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने आवश्यक असणारा निधी नगरोत्थान अभियानमधून उपलब्ध करुन घेण्यावर सर्व नगरसेवकांनी एकमत दर्शविले. प्रभाग क्र. २ रावतळे येथील मुत्तपन मंदिराजवळ साकव बांधण्याच्या कामाबाबत नगरसेविका तेजश्री संकपाळ व माधुरी पोटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या विषयावर चर्चा होत असताना बिल्डरांची सोय व्हावी, यासाठी हा खर्च केला जात आहे. आमची कामे जाणूनबुजून डावलली जात आहेत. हे योग्य नाही, असा आरोप नगरसेवक देवळेकर यांनी केला. याला सत्ताधारी नगरसेवकांनी हरकत घेतली. नगराध्यक्षांनी हे आरोप चुकीचे आहेत, तुम्ही शब्द मागे घ्या, असे सुनावले. महामार्ग ते पाग - बौद्धवाडी सकपाळ यांच्या घराबाबतच्या निविदेमध्ये अंदाजपत्रकीय दरापेक्षा ९ टक्के जादा निविदेस मंजुरी देण्याबाबत चर्चा सुरु असताना नगरसेविका सुरेखा खेराडे यांनी सभागृहात यापूर्वी वाढीव दराच्या निविदेला मंजुरी द्यायची नाही, असा सभागृहात ठराव झाल्याची आठवण करुन दिली. ठराविक ठेकेदारांना पाठीशी घालण्यासाठी जादा दराने काम केले जाते. नगरपालिकेचे यामुळे नुकसान होते. यामुळे इतर ठेकेदारांवर अन्याय होतो. त्यामुळे फेरनिविदेची मागणी करण्यात आली. नगरसेवक सुचय रेडीज, राजू देवळेकर यांनीही चर्चेत सहभाग घेतला. अखेर खेराडे यांनी त्यास विरोध दर्शविला. (प्रतिनिधी)
ठेकेदारांकडून होणारी पिळवणूक थांबणार
By admin | Updated: June 27, 2014 01:07 IST