रत्नागिरी : राज्यातील विविध जिल्हा शासकीय रूग्णालयांत शासनामार्फत सामान्य रूग्णांकरिता अद्ययावत रक्तविघटन केंद्र सुरू झाल्याने खासगी रक्त विघटन केंद्र चालकांच्या काळजात धडकी भरली आहे. सक्षमतेने चालणार्या शासकीय केंद्राशी स्पर्धा करावी लागत असल्याने शासकीय केंद्रांमधील रक्तघटकांचा दर्जा चांगला नसल्याच्या अफवा काहीजणांकडून पसरविल्या जात आहेत. याबाबत राज्य शासनाने माहिती घेऊन अशा अफवा पसरविणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. रत्नागिरीत २४ मे २०१४ रोजी जिल्हा रुग्णालयातील रक्तविघटन केंद्राच्या उदघाटनासाठी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी आले होते. यावेळच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांत अद्ययावत रक्तविघटन केंद्र स्थापन झाल्याने सर्वसामान्यांना कोणत्याही अपघातप्रसंगी वा अन्य कारणाने आवश्यक असल्यास रक्तघटकांची उपलब्धता सुलभ झाली आहे. सर्वसामान्य रुग्णांसाठी ही शासकीय केंद्र मोठा आधार बनली आहेत. शासकीय रक्तविघटन केंद्रांचे कामही चांगल्या प्रकारे सुरू आहे. यापेक्षा चांगल्या आरोग्य सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध केल्या जाणार आहेत, असे सुतोवाच आरोग्यमंत्री शेट्टी यांनी रत्नागिरीच्या भेटीत केले आहे. मात्र, शासकीय रक्तविघटन केंद्र सेवा सक्षम होत असताना काही खासगी रक्त विघटन केंद्र व काही डॉक्टर्स यांनी वेगळा पवित्रा घेत काही ठराविकच रक्तविघटन केंद्रातील रक्त घटक चांगल्या दर्जाचे असून, अन्य केंद्रांबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. असे करताना आपलीच मक्तेदारी या क्षेत्रावर निर्माण करण्याचा प्रयत्न काहींकडून सुरू आहे. शासकीय केंद्रातील रक्त घटक दर्जेदार नाहीत, असे म्हणणार्यांना खडसावताना मंत्री शेट्टी म्हणाले, रक्त दर्जेदार नाही म्हणजे ते काय दूध आहे? दुधात पाणी भेसळ केली जाते तसे रक्ताचे आहे काय? केवळ जनतेची दिशाभूल करून आपली मक्तेदारी संपेल, या भीतीने या अफवा पसरविल्या जात आहेत, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा अफवा पसरविणार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जनतेतून होत आहे. (प्रतिनिधी)
खासगी रक्तविघटन केंद्रांना धडकी!
By admin | Updated: May 29, 2014 00:46 IST