देवरुख : कोकण रेल्वेमध्ये भूमिपुत्रांना नोकरी व रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आयडियल ग्रुप, कडवई (ता. संगमेश्वर) यांच्यावतीने रेल्वेमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा देवरुख येथे नुकताच सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयडियल ग्रुप, कडवईच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला व कोकण रेल्वेसंदर्भात काही मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. भूमिपुत्रांना नोकरी व रोजगारामध्ये प्राधान्य द्या, संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील नियोजित रेल्वे स्थानकाला त्वरित मंजुरी देऊन रेल्वेला थांबा देण्यात यावा, कोकण रेल्वेमध्ये शक्य असतील त्या अटी शिथील करुन प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य द्यावे, कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना अत्यल्प दरात कोकणरेल्वे स्थानकावर स्टॉल उपलब्ध व्हावेत, संगमेश्वर रेल्वे स्थाकनावरील सर्व गाड्यांची आरक्षण क्षमता वाढवून मिळावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.यावेळी आयडियल ग्रुपचे अध्यक्ष नीलेश कुंभार, शशिकांत किंजळकर, अभिजीत मोहिरे, नरेश ओकटे, रोशन सुर्वे, प्रशांत सावरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोकण रेल्वे भरतीत भूमिपुत्रांना प्राधान्य द्या
By admin | Updated: January 7, 2015 00:01 IST