दापोली : नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या प्राैढ महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार, ९ सप्टेंबर राेजी सकाळी दापाेली तालुक्यातील शिर्दे पूर्ववाडी येथे घडली. मीनाक्षी खळे (वय ५५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
दापोली पोलीस स्थानकातून दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी खळे या भोमेश्वर मंदिराजवळ असणाऱ्या नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या हाेत्या. दुपार झाल्यानंतरही त्या घरी न परतल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी नदीकिनारी पाहिले असता नदीमधील झाडामध्ये त्यांचा मृतदेह अडकलेला आढळला. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मीनाक्षी खळे या गणेशोत्सव कार्यक्रमासाठी मुंबईमधून शिर्दे येथे दोन दिवसांंपूर्वीच आलेल्या होत्या. या प्रकरणाचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल अशोक गायकवाड करीत आहेत.