रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथे वाहतूक पोलीस कार्यालयात विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शनाखाली बजरंग दलाच्या वतीने पीपीई किटचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नारायण रोडे व अन्य उपस्थित होते.
कॅफेटरिया भाताची लागवड
पावस : कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पावस पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी कॅफेटरिया भाताची लागवड केली आहे. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी, आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात राज्य शासनाचा कृषी विभाग यशस्वी झाला आहे.
प्रशासकीय अडथळे दूर
रत्नागिरी : पर्यावरण विभागाने सीआरझेडची रीतसर परवानगी दिल्याने मिऱ्या गावातील धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यामागील सर्व प्रशासकीय अडथळे दूर झाले आहेत. गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
घाटातील मार्ग खड्ड्यातच
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील खोपी फाट्यापासून भोस्ते घाटातील काही अंतरापर्यंत चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. घाटातील मार्गावरील खड्ड्यांचा विस्तारही वाढत चालला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
पेट्रोल १०६ रुपये लिटर
चिपळूण : तालुक्यातील पेट्रोल पंपावर सध्या पेट्रोलचे दर भरमसाठ वाढल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. सध्या मुंबईत १०४ रुपये लिटर पेट्रोल असून चिपळूणमध्ये १०६ रुपये दराने पेट्रोल वाहनचालकांना खरेदी करावे लागत आहे. यामुळे तीव्र नाराजी पसरली आहे.
यंत्रणा सज्ज
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या अधिकार क्षेत्रात कुठेही दरड कोसळल्यास त्या ठिकाणचा रस्ता मोकळा करण्यासाठी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची यंत्रणा सज्ज आहे. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या मार्गावर कर्मचारी दोन वेळा गस्त घालत आहेत.
वरुण राजाच्या वाटेकडे डोळे
राजापूर : दमदार आगमनानंतर गेले काही दिवस पावसाने दडी मारल्याने लावणीच्या कामावर परिणाम होऊ लागला आहे. यामुळे शेतकरी राजा चातकाप्रमाणे वरुण राजाच्या वाटेकडे डोळे लावून बसला आहे. यंदाचा पाऊस समाधानकारक सुरु झाला होता.
कोरोना मुक्तीकडे वाटचाल
गुहागर : तालुक्यातील पालशेत गाव कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी तसेच पालशेत गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्राम कृती दल यांनी या गावात राबवलेल्या कडक नियमावलीमुळे कोरोनावर विजय मिळविण्यात यश आले आहे.
सहायक आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये आरेाग्य अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर काढल्यानंतर त्या ठिकाणी जागा रिक्त आहे. तर वाशिम जिल्ह्यातील सहायक आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद आरोग्य विभागात पुन्हा प्रतिनियुक्तीवर डॉ. संगीता देशमुख यांना नेमण्यात आले आहे.