खेड : तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि १० पोटनिवडणुकांसाठी बुधवारी शांततेत मतदान पार पडले. ८७ ग्रामपंचायतींपैकी ६१ ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. यातील भरणे आणि भडगाव या ग्रामपंचायतींमध्ये सेना-मनसे युतीने चांगले यश मिळविले. १० ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संमिश्र यश मिळाले आहे. उर्वरित १६ ग्रामंपचायती गाव पॅनेलच्या माध्यमातून बिनविरोध निवडून आल्या आहेत. मात्र, १० पोटनिवडणुकांची आकडेवारी उशिरापर्यंत हाती आली नव्हती़ खेड तालुक्यातील भरणे, तळे, शेरवली, संगलट, कर्जी आमशेत, कोरेगाव, सुकदर, दयाळ, होडखाड, तुंबाड, शिवतर, आंबये, चाकाळे, हुंबरी, वडगाव, कुळवंडी, कशेडी आदी ग्रामपंचायती शिवसेनेने खेचल्या आहेत. या तुलनेत मुरडे आणि पोयनार ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे आल्या आहेत. पोयनार ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला १०० टक्के यश मिळाले आहे. राष्ट्रवादीचे अजय बिरवटकर यांचे वर्चस्व असल्याने ही ग्रामंपचायत राष्ट्रवादीकडे गेली. या तुलनेत तालुक्यात शिवसेनेने आपली भगवी लाट कायम ठेवली आहे. भडगाव ग्रामपंचायत यापूर्वी मनसेच्या ताब्यात होती़ आता शिवसेनेला ७, तर मनसेला अवघ्या ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेने ही ग्रामपंचायत खेचून आणली आहे. भरणे ग्रामपंचायतीमध्ये सेना आणि मनसेला ९ जागा जिंकता आल्या आहेत, तर राष्ट्रवादीला अवघ्या ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यावेळी आमदार संजय कदम यांनी सलग तीन दिवस भरणे येथे आपला मुक्काम ठेवला होता. त्यामुळे भरणे यावेळी राष्ट्रवादीकडे जाणार, अशी अपेक्षा होती़ मात्र यावेळी मतदारांनी पूर्णपणे अपेक्षाभंग करीत सत्ता सेना आणि मनसेच्या ताब्यात दिली आहे़ (प्रतिनिधी)
खेडमध्ये ६१ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात
By admin | Updated: April 24, 2015 01:27 IST