रत्नागिरी : जनआशीर्वाद यात्रेत चार जणांच्या गळ्यातील सोन्याच्या अडीच लाख रुपयांच्या चेन लांबवणाऱ्या सात संशयितांच्या टोळीच्या मुसक्या रत्नागिरी शहर पोलिसांच्या पथकाने बीडमधून आवळल्या. या तपासात सहभागी असलेले माळवाशी (ता. संगमेश्वर) गावचे सुपुत्र व सध्या रत्नागिरी शहर येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक नंदकुमार सावंत यांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी केला.
शहर पोलिसांच्या पथकाने तपास करताना चोरीतील ३ चेन व रोख रक्कम ६ हजार ८०० तसेच गुन्ह्यातील स्विफ्ट डिझायर कार व मोबाइल असा एकूण ४ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. रत्नागिरी पोलिसांच्या पथकात नंदकुमार सावंत यांचा समावेश होता. या उल्लेखनीय कार्याबद्दल माळवाशीच्या सरपंच वैजयंती करंडे, उपसरपंच सुनील सावंत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष चंद्रकांत कडू, दिलीप कडू, दिलीप कांबळे, नंदकिशोर जौरत, अनंत सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी पोलीस नाईक नंदकुमार सावंत यांचे अभिनंदन केले.