साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील देवडे आदिष्टीवाडी येथील गंजलेले व धोकादायक पोल मोठ्या प्रमाणावर आहेत. याबाबत अनेक महिन्यांपासून साखरपा, देवरूख आणि रत्नागिरी येथील कार्यालयांशी वारंवार संपर्क करून तक्रार केली जात आहे. मात्र, अजूनही हे पोल बदलण्याबाबत कोणतीच हालचाल दिसत नाही.
शाळा कधी सुरू होणार?
रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने शाळाही सुरू होण्यासाठी मुदत वाढवली आहे. दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा सुरू होतात. मात्र, यावेळी अनिश्चित काळासाठी शाळा बंद राहिल्याने मुलांना आता शाळेचे वेध लागले आहेत. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार, अशी विचारणाही होत आहे.
रस्त्याची बिकट अवस्था
लांजा : तालुक्यातील निवसर येथील रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १९ लाख २० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून आंजणारी पूल ते निवसर मळा हा रस्ता करण्यात आला होता. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांतच हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे.
रुग्ण कधी कमी होणार?
चिपळूण : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून भरमसाट वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन सुरू केले आहे. मात्र, अजूनही रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता नाही.
कनेक्टिव्हिटीचा अडसर
साखरपा : दुर्गम भागात इंटरनेट सुविधांमध्ये सातत्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करणे लाभार्थ्यांना अवघड होत आहे. मात्र, लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करताना कनेक्टिव्हिटीचा अडसर होत आहे.
प्रवाशांची गैरसोय
मंडणगड : लॉकडाऊन शिथिल झाल्याने जिल्हांतर्गत प्रवासावरील बंदीही उठली आहे. त्यामुळे येथील आगाराने ग्रामीण भागासह विविध ठिकाणी प्रवासीफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र, प्रवास करताना कोरोनाच्या अनुषंगाने गर्दीचे नियम न पाळणे, गाड्या वेळेवर न सोडणे यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.
पर्यटनस्थळे शांतच
दापोली : कोरोनाच्या भीतीने नागरिकांच्या फिरण्यावर आपोआपच मर्यादा आल्या आहेत. वर्षभर गजबजाट असलेली सार्वजनिक स्थळे आता सुनीसुनी झाली असून पर्यटन क्षेत्राकडेही पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे.
खोदकाम त्रासदायक
रत्नागिरी : सध्या शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कडेला चर खणण्याचे काम सुरू आहे. सुमारे २ ते ३ फूट लांब खोदलेल्या या चरांमध्ये तात्पुरती माती टाकली असल्याने सध्या पावसामुळे यात मोठ्या प्रमाणावर चिखल निर्माण झाला आहे. या रस्त्यांवरून येजा करणा-या वाहनचालकांना अतिशय त्रासाचे होत आहे. त्यातच सध्या अधूनमधून पाऊसही सुरू असल्याने मातीमिश्रित चिखलाचे पाणी रस्त्यावर येत आहे.
इंटरनेट सेवेचा बोजवारा
आवाशी : खेड शहरासह ग्रामीण भागात सध्या बीएसएनएल कंपनीच्या सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून इंटरनेट सेवा कोलमडली असल्याने शासकीय कार्यालयांसह बँकांमधील कामकाज विस्कळीत झाले आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे.
मोरीला भगदाड
मंडणगड : कुंबळे-तिडे गावाला जोडणाऱ्या भारजा नदीवरील मोरीला मोठे भगदाड पडले आहे. तालुक्याशी संपर्क कायम ठेवण्यासाठी ही मोरी महत्त्वाची आहे. दरवर्षी पावसात या मोरीवरून पाणी जात असल्याने ठिकठिकाणी भगदाड पडलेले आहे.