खेड : कापड विक्रीची वसुली करून कोल्हापूरला परत जाणाऱ्या अशोक नानुमल बदलानी (रा. गांधीनगर, कोल्हापूर) या व्यापाऱ्याला चोरट्यांच्या टोळीने लुटल्याची घटना आज शनिवारी खेड बसस्थानकात घडली. त्यांच्या खांद्यावरील बॅगेतून २ लाख ८१ हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली आहे. चोरट्यांनी रेकी करूनच ही धाडसी चोरी केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रोकड लंपास केल्याची या दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. शनिवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक काकडे तपास करीत आहेत. हा अप्रकार लक्षात येताच बदलानी यांनी तत्काळ खेड पोलिसांना त्याची माहिती दिली. खेडचे पोलीस निरीक्षक अशोक जांभळे आणि कर्मचारी लगेचच बस स्थानकात गेले. मात्र, तोपर्यंत चोरटे पळून गेले होते. या चोरीनंतर पोलिसांनी नाकेबंदी केली. मात्र, याचा फारसा उपयोग झाली नाही. खेड बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नसल्याने चोरट्यांचा माग काढण्यात खेड पोलिसांना कठीण होणार आहे. कोल्हापूर येथील तयार कपड्यांचे व्यापारी अशोक बदलानी हे तीन दिवसापूर्वी दापोली आणि मंडगणड तालुक्यातील वसुली करून खेडमध्ये आले होते. खेडमधील वसुली केल्यानंतर त्यांनी एकूण २ लाख ८१ हजार रूपयांची रोकड बॅगेमध्ये ठेवली होती. ती रोकड घेऊन कोल्हापूरला जाण्यासाठी ते खेड बसस्थानकात आले. दुपारी १२.१५ वाजता सुटणारी खेड-कोल्हापूर या बसमध्ये चढले. यावेळी गाडीला गर्दी होती. याचाच फायदा घेत या चोरट्यांच्या टोळीने त्यांच्या खांद्याला लावलेल्या बॅगेचा मागील भाग ब्लेडसदृश वस्तूने कापला आणि आतील सर्व रोकड घेऊन चोरटे पळून गेले. ही घटना घडत असताना बदलानी यांना काहीच समजले नाही. बस सुटण्यास ५ मिनिटे असतानाच त्यांना आपली बॅग कापल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी आरडाओरडा केला. याप्रसंगी स्थानक परिसरातील पोलिसांना पाचारण करताच त्यांनीही शोधाशोध केली. बसमधील प्रवाशांचीही झडती घेण्यात आली. मात्र काहीही हाती लागले नाही. दापोली आणि मंडणगडपासूनच हे चोरटे व्यापाऱ्याच्या मागावर असावी, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. (प्रतिनिधी)
खेड बस स्थानकात व्यापाऱ्याची लूट
By admin | Updated: September 27, 2015 00:45 IST