आबलोली : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, समतादूत प्रकल्पांतर्गत दिनांक ५ जून ते २६ जूनदरम्यान वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या अभियानात बार्टीच्या समतादूतांमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात ५०,००० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली. वड पिंपळ, कडुनिंब, साग, शिवण, वड, खैर, चिंच, बदाम, मोह, आवळा, काजू, करंज इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली.
पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड हाच पर्याय आहे. सध्याच्या कोरोना आपत्तीच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व जाणिवेसह अधोरेखित झाले आहे. बार्टीचे प्रत्येक तालुक्यात समतादूत कार्यरत आहेत. बार्टीच्या विविध उपक्रमांची तळागाळापर्यंत माहिती देऊन त्यांची अंमलबजावणी हे समतादूत करीत आहेत.
या अभियानासाठी महासंचालक बार्टी, पुणे, तसेच प्रकल्प अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच लावलेले वृक्ष जगविण्याची स्थानिक पातळीवरील नागरिक/प्रतिनिधी व समतादूत यांनी जबाबदारी घेतली आहे. बार्टीमार्फत विभागनिहाय पुणे १८,२००, औरंगाबाद ४,४५९, अमरावती १८,१५६, नाशिक ४,६६६, लातूर २,६७१, नागपूर ३,८४१, कोकण २,५७२ अशा एकूण ५४,५६५ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.