दापोली : येथील कै. गणेश दातार वृद्धाश्रम येथे वृक्षप्रेमी युवा गटाने श्रमदान करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. या भागात या गटाच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण उपक्रम राबविला. यावेळी सुनंदन भावे, प्रवीण जोशी, रावेश गुरव, मनीष कोळेकर आणि अन्य कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
गावठी भाजीला मागणी
देवरुख : सध्या गावठी भाज्यांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. घाटमाथ्यावरून भाजीपाला येत असला तरी स्थानिक शेतकरी पिकवित असलेल्या या रुचकर गावठी भाज्यांना अधिक मागणी आहे. सध्या भेंडी, काकडी, कारले, चिबूड, भोपळा, दुधीभोपळा आदी गावठी भाज्या मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जात आहेत.
मानधन थकले
खेड : जिल्ह्यातील पोलीस पाटील यांचे मानधन थकले आहे. बहुतांशी पोलीस पाटील शेतकरी असून जुलै महिन्यात झालेल्या महापुरात त्यांच्या शेतीला त्याचा फटका बसला आहे. त्यातच या पोलीस पाटलांना मानधन न मिळाल्याने आर्थिक कोंडी झाली आहे. काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. त्यापूर्वी त्यांना हे मानधन मिळावे अशी मागणी केली जात आहे.
गौराई सजावट स्पर्धा
सावर्डे : चिपळूण येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरातील नागरिकांसाठी घरगुती गणपती गौराई सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांसाठी दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, घरगुती गौराई गणपती सजावट स्पर्धा होणार आहे. ८ सप्टेंबरपर्यंत स्पर्धेकरिता नावनोंदणी करता येणार आहे. परीक्षण १० ते १५ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
बससेवा सुरू होणार
खेड : तालुक्यातील तुळशी ते विरार अर्नाळा व कल्याण विठ्ठलवाडी ही बससेवा रविवारपासून सुरू होणार आहे. तुळशी ते विरार अर्नाळा ही गाडी खेडवरून सकाळी ८ वाजता सुटणार आहे व विरार अर्नाळा येथे सायंकाळी ६ वाजता पोहोचेल. तसेच कल्याण - विठ्ठलवाडी ही बस खेडवरून सकाळी ९ वाजता सुटून कल्याण- विठ्ठलवाडी येथे सायंकाळी ४.२० वाजता पोहोचेल.