खेड : पर्यावरणाचा समतोल राखावा या हेतूने येथील शिवसेना, युवा सेना आणि युती सेनेच्यावतीने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. लोटेमाळ येथे झालेल्या या उपक्रमावेळी युवा सेनेचे उपतालुकाधिकारी केतन वारणकर, रोहन कालेकर, सौरभ चाळके, प्रसाद सावंत, धनंजय पटवर्धन, सचिन कालेकर, रुपेश काटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विजेचा लपंडाव कायम
चिपळूण : शहरानजीकच्या गोवळकोट परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून विजेच्या लपंडावाला सुरुवात झाली आहे. दिवसातून सतत चार ते पाचवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने सध्या ऑनलाईन कामावर त्याचा परिणाम झाला आहे. अनेकांचे सध्या वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने त्यात व्यत्यय येत आहे.
जनजागृती मोहीम
साखरपा : पिकांचे उत्पादनक्षम क्षेत्र वाढावे, शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा पर्याय स्वीकारावा यासाठी खरीप हंगाम पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेबाबत कृषी विभागातर्फे संगमेश्वर तालुक्याच्या विविध विभागांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
शिरगाव : विस्टी ऑन टेक्निकल आणि सर्व्हीसेस सेंटर पिंपरी चिंचवड आणि चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक संघाच्या सहकार्याने कोळकेवाडीतील अनेक गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरित करण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव दीपक माने, कोळकेवाडी सरपंच पल्लवी शिंदे तसेच कंपनीचे अध्यक्ष आशिष भाटीया आदी उपस्थित होते.
विद्युत खांब बदला
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील देवडे आदिष्टी वाडीतील गंजलेले आणि धोकादायक विद्युत खांब याबाबत तक्रार करूनही ते बदलण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत इथल्या ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून तक्रार नोंदवूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही.
खासगी संस्थांचा पुढाकार
रत्नागिरी : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कांदळवन विभागाने पुढाकार घेतला आहे. कांदळवनाच्या संरक्षणासाठी शासनाने नवीन कायदा तयार केल्याने लागवड क्षेत्र वाढले आहे. कांदळवन तोडीचे प्रमाण घटून क्षेत्र वाढविण्याकरिता आता खासगी संस्थांकडूनही पुढाकार घेतला जात आहे. त्यामुळे वर्षभरात हे क्षेत्र अधिकच वाढेल.
सामाजिक बांधिलकी
देवरुख : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित जनकल्याण समितीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाद्वारे सामाजिक बांधिलकी जतन केली आहे. गेल्या आठवड्यात सायले, काटवली परिसरातील ग्रामस्थांना स्वयंरोजगारासाठी घरघंटीचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन काळात गरीब कुटुंबांनाही मदतीचा हात दिला आहे.
संरक्षक भिंत कोसळली
रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे करंदीकरवाडी ते कालिका मंदिर रस्त्याजवळील संरक्षक भिंत अतिवृष्टीत कोसळली आहे. जमीन २० फूट खोल खचून पूर्णत: वाहुन गेली आहे. त्यामुळे मुख्य रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. ग्रामस्थांनी बौद्धवाडी रस्त्याचा पर्याय वापरावा, असे आवाहन मिरजोळे ग्रुप ग्रामपंचायतीने केले आहे.
घाटासाठी बंदी
खेड : रघुवीर घाट या खोपी शिरगाव परिसरातील पर्यटन स्थळाकडे जाण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. खेडचे उपविभागीय अधिकारी अविषकुमार सोनोने यांनी या आशयाचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सध्या या ठिकाणी मनाई करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण
सावर्डे : चिपळूण शहरातील मुरादपूर प्रभाग क्रमांक १ मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम नुकतीच राबविण्यात आली. मुरादपूर येथील महाराष्ट्र हायस्कूल येथे लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. नगर परिषदेतील आरोग्य समिती सभापती शशिकांत मोदी, रौस वांगडे तसेच अन्य नगरसेवक उपस्थित होते.
मोरी खचली
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे रस्त्यावरील मोरी खचल्याने या मार्गावरील वाहतूक सोमवारी दोन तासांहून अधिक काळ बंद होती. तालुक्यातील अनेक मार्गांवर मोरी खचण्याचे प्रकार घडले. तसेच अनेक झाडांच्या फांद्या कोसळल्या. त्यामुळे तालुक्याच्या अंतर्गत भागातील वाहतूक अंशत: विस्कळीत झाली होती.
खड्ड्यांचे साम्राज्य
चिपळूण : काडवली ते निर्बाडे या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. सध्या पाऊस सुरू असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. वाहन चालकांना पाण्यामध्ये या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ लागले आहेत. संबंधित विभागाने खड्डे भरण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
फळबाग लागवड
दापोली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दापोली मतदार संघात किमान १०० हेक्टरवर लागवड करण्याचा निर्धार येथील कृषी विभागाने केला आहे. खेड, दापोली, मंडणगड येथील कृषी पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शासनाच्या या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
किल्ल्याचे संवर्धन
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शहरातील रत्नदुर्ग किल्ला हा पर्यटकांचे आकर्षण आहे. मात्र, या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. या किल्ल्याच्या परिसरातील तटबंदी नादुरुस्त होऊ लागली आहे. भगवती मंदिर ते दीपगृह या ठिकाणी वृक्षलागवड करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे.
धरणे भरली
रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणारी तालुक्यातील शीळ आणि पानवल येथील धरणे पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागली आहेत. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये भरणाऱ्या या धरणातील पाण्याचा कोटा आताच पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता शहराला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे.