आरवली : संगमेश्वर तालुक्यातील शिंदेआंबेरी येथे पाझर तलावाच्या कामाला २००९ साली मंजुरी देण्यात आली आणि कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, ५ वर्ष होऊन गेली तरी या पाझर तलावाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. गेल्यावर्षी पावसाळ्यात या पाझर तलावाला खराब कामामुळे अनेक ठिकाणी भगदाडे पडली होती. त्यानंतर या तलावातील पाणी सोडून देण्यात आले होते. आता पुन्हा हे सर्व बांधकाम तोडून नवीन बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या पाझर तलावाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने २००९ साली संगमेश्वर तालुक्यातील खडीओझरे, मेघी गावकरवाडी, देवरुख परशुरामवाडी, तांबेडी, शिंदेआंबेरी, अंत्रवली अशा ६ पाझर तलावांना प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग रत्नागिरी यांनी निविदा प्रसिद्ध करुन या कामाचा ठेका दिला. मात्र, या निविदा प्रसिद्ध करताना त्या रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिध्द करणे गरजेचे होते. मात्र, या निविदांची प्रसिध्दी रायगड जिल्ह्यातील वर्तमान पत्रातून करण्यात आल्याचे समोर येत आहे.लघुपाटबंधारे रत्नागिरीच्या कार्यक्षेत्रातील शिंदे आंबेरी पाझर तलावाच्या योजनेस ४८ लाख ८३ हजार ६४३ रुपये रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ९ फेब्रुवारी २००९ च्या आदेशानुसार ३६ लाख ५२६ हजार ९५२ रुपये इतक्या रक्कमेस तांत्रिक मान्यता देण्यात आली. या योजनेची सिंचन क्षमता ३३ हेक्टर इतकी आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होवून हे काम अमृता कन्स्ट्रक्शन कंपनी खेड यांना देण्यात आले. काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी निश्चित झाला. ६ नोव्हेंबर २००९ रोजी कामाची वर्कआॅर्डर देण्यात आली. मात्र, ५ वर्षे पूर्ण होत आली तरीही हे काम अपूर्ण होत असल्याचे दिसून येत आहे.ठेकेदाराला कामाचे २९ लाखाचे बिलही अदा करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या विरोधामुळे या कामाला उशीर झाला असल्याचे लघुपाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ग्रामस्थांकडून अशा कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.गेल्यावर्षी पावसाळ्यात या पाझर तलावाच्या भिंतीचे जवळजवळ १०२ मीटर उंचीचे काम पूर्ण झाले होते. मात्र, ८२ मीटर उंचीवर या भिंतीच्या भागाला सरळ रेषेत मोठमोठी भगदाडे पडून गळती लागली होती. त्यावेळी संबंधित यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली होती. तलावही तुडुंब भरला होता. त्यामुळे गळती थांबवणे कठीण बनले होते. अखेर सांडव्याजवळ ब्लास्टिंग करुन तलावातील पाणी सोडून देण्यात आले होते. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त होत आहे. सध्या ८२ मीटरवरील सर्व भराव काढून टाकून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्यावर्षी झालेल्या गळतीमुळे तलावाचा बराचसा भाग घसरुन आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. या सर्व गंभीर प्रकाराची दखल पाटबंधारे विभागाने घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (वार्ताहर)संथगतीचा कारभारएकीकडे पाणीटंचाई हा विषय चर्चेचा ठरत असताना पाण्याच्या स्रोतासाठी शासनाने तयार केलेली बांधकामेच किती कुचकामी आहेत, हे शिंदे आंबेरी येथील पाझर तलावाच्या कामावरून दिसून येते. या तलावाची निकृष्ट कामामुळे पडझड झाली. त्यामुळे आता नव्याने काम सुरू झाले आहे.
पाझर तलाव काम रखडले
By admin | Updated: April 2, 2015 00:46 IST