खेड : पोलीस पाटील यांचे थकीत मानधन गणपती सणापूर्वी द्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप गमरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १२०० पोलीस पाटील आपली सेवा बजावत आहेत. आपापल्या गावात शांतता, सुव्यवस्था उत्तमपणे पार पाडण्याचे काम करीत आहेत. तसेच कोविड - १९ च्या अनुषंगाने शासन व प्रशासनाच्या आदेशांचे तंतोतंत अंमलबजावणी करण्यात पोलीस पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आपण व आपले सर्व अधिकारी पोलीस पाटील यांना शाब्दिक शाबासकी देतात. मात्र, पोलीस पाटील यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रमाणपत्र, प्रोत्साहनपर भत्ता वगैरे काहीच मिळालेले नाही. तसेच कोणत्याही सुविधा मिळालेल्या नाहीत. मानधनही वेळेवर दरमहा मिळत नाही. चार ते पाच महिने तर प्रवास भत्ताही थकीत आहे. तरीही कर्तव्यात कसूर नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
जिल्ह्यातील नव्वद टक्के पोलीस पाटील शेतकरी आहेत. अतिवृष्टीत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीखेरीज अन्य जोडव्यवसायही नाही. शेतकरी बांधवांप्रमाणे पोलीस पाटील यांच्याही शेतीचे नुकसान झाले आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असून, थकीत मानधनाची रक्कम प्राप्त झाल्यास सण साजरा करणे सोपे होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.