रत्नागिरी : गेल्या काही कालावधीत महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने पर्यटक निवासांकरिता विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा सपाटा लावला आहे. जिल्ह्यातील वेळणेश्वर येथील महामंडळाचे पर्यटक निवास विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला जाणार आहे. त्यानुसार तेथे पवनचक्कीसाठी मनोरा उभारण्याचे काम सुरू झाले आहे. ही माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी लोकमतला दिली. महामंडळातर्फे रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथेही पवनचक्की मनोरा उभारणीचे काम सुरू आहे. वेळणेश्वर या महामंडळाच्या पर्यटक निवासातील १५ खोल्यांकरिता २४ तास गरम पाण्याची सोय करण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी उष्णजल संयंत्रे (सोलर हॉट वॉटर सिस्टीम) मार्च २०१४ पासून कार्यान्वित झाली आहे. त्यानंतर आता याच निवासांना लागणारी वीज ही पवन ऊर्जेद्वारे निर्माण करण्याचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून निवासातील वातानुकलन यंत्रणावगळता अन्य कारणांसाठीची संपूर्ण विजेची गरज भागविली जाणार आहे. त्यात पंखे, दूरचित्रवाहिनी संच, रेस्टॉरंटसाठी लागणारी वीज तसेच स्वागत कक्ष व अन्य कारणासाठी निवासात लागणारी वीज यांचा समावेश आहे. भविष्यात पर्यटन महामंडळाच्या दोन्ही जिल्ह्यातील पर्यटक निवासात टप्प्या टप्प्याने उष्णजल संयंत्रे व पवन ऊर्जा निर्मितीचे संच बसविण्याचा महामंडळाचा मानस असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वेळणेश्वर पर्यटक निवासानजीक पवनचक्की
By admin | Updated: October 17, 2014 22:59 IST