खेड : शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत घट होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे; मात्र कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सातत्याने दिल्या जात असताना त्याकडे कानाडोळा करत शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
नगर प्रशासनाची कारवाईची मोहीम थंडावल्याने नागरिक बिनधास्तपणे बाजारपेठेत वावरत आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर नगर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. १७ दिवसात कोरोनाचे अवघे ४३ रुग्ण आढळले आहेत. एकीकडे शहरासह ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात येत असताना दुसरीकडे मात्र कोरोना नियमांचा पुरता फज्जा उडाला आहे. ग्रामीण भागातून शहरात कामकाजासाठी येणाऱ्या ग्रामस्थांसह शहरातील नागरिक विनामास्क बाजारात फिरताहेत.
नगर प्रशासनाकडून कुणावरही कारवाई केली जात नसल्याने साऱ्यांचेच फावले आहे. या नागरिकांना कोरोनाचा विसर पडला आहे. नगर प्रशासनाची कारवाई थंडावली असली तरी पोलीस यंत्रणेकडून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे; मात्र ही कारवाई तात्पुरत्या स्वरूपातच केली जात आहे.