रत्नागिरी : केवळ हातात दंडुका घेऊन गुन्हेगारांवर कारवाई नाही तर वेळ पडली तर श्रमदानासाठीही आम्ही हात पुढे करू, असा संदेश रत्नागिरी जिल्हा पाेलीस दलाने दिला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या नेतृत्त्वाखाली पाेलीस दल, चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले असून, पाेलीस अधीक्षक स्वत: तेथे ठाण मांडून आहेत.
चिपळूणच्या महापुराने शहर आणि परिसर होत्याचा नव्हता झाला. पुराचे पाणी घरात आणि घरातले समान रस्त्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पूर ओसरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अशावेळी चिपळूण नगर परिषदेसह अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीसही यात मागे नाही. स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस अंमलदार, पोलीस मित्र व पोलीस स्वयंसेवक कार्यरत आहेत. या सर्वांनी चिपळूण बाजारपेठेतील पूरप्रभावित भेंडीनाका परिसर, सोनार गल्ली परिसर, पानगल्ली परिसरातील दोन रस्त्यांवरील चिखल व साचलेला ढिगारा साफ करून नागरिकांना मदतकार्य केले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नेहमीच कार्यरत राहणारे पाेलीस दल संकटकाळात मदतीचा हात देण्यासाठी पुढे राहिले आहे. पूरग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्याबराेबरच त्यांना मदत करण्यासाठी पाेलीस दल कार्यरत आहे. जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. गर्ग यांच्या नेतृत्त्वाखाली पाेलीस दलाने नागरिकांच्या व्यथा जाणून घेऊन स्वच्छतेसाठी मदत केली.
----------------------
चिपळूण येथील पूरग्रस्त भागात पाेलीस अधीक्षक डाॅ. माेहितकुमार गर्ग यांनी स्वच्छता माेहिमेत सहभाग घेतला हाेता.