गुहागर : तालुक्यातील पाचेरी सडा धान्य दुकान चालक व ग्राहकांमध्ये वाद निर्माण झाल्याने याबाबत तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी विशेष बैठक घेऊन समुपदेशनातून ग्रामस्थांच्या तक्रारींचे निरसन केले.
विकास सोसायटीचे सचिव श्रीकृष्ण सावरकर व दुकानातील सेल्समन विश्वास खरे या दोघांबाबत संतोष माने आदी तिघांनी तहसीलदारांकडे तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पाचेरी सडा रेशन दुकानाचे सेल्समन विश्वास खरे यांची दुकानांमधून बदली केल्याशिवाय आम्ही धान्य घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. याबाबत तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी समुपदेशनाने यशस्वीपणे हा वाद मिटवला. हा वाद मिटल्यानंतर धान्याची उचल करण्यास ग्रामस्थांनी तयारी दर्शवली. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, मंडल अधिकारी, तलाठी उपस्थित होते.