रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यास सुरुवात झाली असून, येत्या पाच ते सहा दिवसांत हा प्लांट सुरू होईल. जिल्हा महिला रुग्णालयातही ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ९० लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कामथे, कळंबणी, दापोली शहर आणि राजापूर शहर या ठिकाणीही असे प्लांट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा नियोजनमधून आणखी दहा व्हेंटिलेटर्स घेण्याचा निर्णय सोमवारी काेविडच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी झूम ॲपद्वारे आयोजित केलेल्या बैठकीत दिली. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड याही सहभागी होत्या.
कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. त्या दृष्टीने जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याने साेमवारी रत्नागिरी जिल्ह्यातील कोराेना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक सामंत यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी हे निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्या प्रयत्नांमुळे सध्या जिल्ह्यात २८ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा असून, तो तीन दिवस पुरेल. रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट पाच दिवसांत सुरू होईल. अन्य पाच ठिकाणीही येत्या महिनाभरात प्लांट सुरू होतील, असेही सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील कोराेना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन बेडची परिस्थिती नाजूक आहे. यासाठी रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालय येथे तसेच जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचे प्रत्येकी ३० बेड तातडीने वाढविण्यात येणार आहेत. सध्या २०५५ साधे बेड आहेत. त्यातही येत्या दोन-तीन दिवसांत वाढ करण्यात येईल, अशी माहितीही सामंत यांनी दिली.
ओणीत कोविड रुग्णालय
राजन साळवी यांच्या प्रयत्नाने ओणी (ता. राजापूर) येथे काेविड रुग्णालय सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात अपुऱ्या सुविधा असलेल्या दहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालये यासाठी सामंत आपल्या निधीतून एक कोटीचा खर्च करणार आहेत. तसेच आमदार शेखर निकम, भास्कर जाधव आणि योगेश कदम हेही असा निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.
केंद्राकडून लस पुरवठ्याची प्रतीक्षा
जिल्ह्यात लसीकरणाचे काम ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सुरू असून, एक दिवसाआड लसींचा पुरवठा होत आहे. सध्या १ लाख १९ हजार ८३ जणांचे लसीकरण झाले असून, १ लाख २ हजार ७७१ जणांचा पहिला तर १६ हजार जणांचा दुसरा डोस झाला आहे. लससाठी केंद्र सरकारवर अवलंबून रहावे लागते. रत्नागिरीत दोन दिवसांत ५९३० डोस जिल्ह्याला उपलब्ध होतील. सध्या रेमडेसिविरची १०० इंजेक्शन्स उपलब्ध असून, एका दिवसात आणखी ४०० येणे अपेक्षित आहे.
मनुष्यबळासाठी प्रयत्न
वाढत्या रुग्णसंख्येच्या दृष्टीने अधिक मनुष्यबळाची गरज आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही समस्या आहे. जिल्ह्यातही लवकरात लवकर जागा भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णवाहिकेच्या बाबतीतही पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार.
जम्बो कोविड सेंटर
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबईच्या स्तरावर काेविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सध्या आहे तेच मनुष्यबळ वापरले जाईल. तसेच आवश्यकतेनुसार आहे त्याच एजन्सीजचे सहकार्य घेतले जाणार आहे.
गृह विलगीकरणासाठी हाॅटेलचा पर्याय
ज्यांची गृह विलगीकरणात राहण्याची व्यवस्था नसेल आणि त्यांना स्वत:चा खर्च करून रहायचे असेल, अशांसाठीही हाॅटेलच्या दराबाबत चर्चा करू. त्यानंतर याबाबत हाॅटेल असोसिएशनसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
चाचण्यांसाठी युनिट वाढविणार
कोरोना चाचणीसाठी उभारण्यात आलेल्या सर्व केंद्रांवर नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सध्या दरदिवशी १२०० चाचण्या होत आहेत. तरीही आता गर्दी होत असल्याने ४०० चे युनिट घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन तसेच आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चाचणीचे अहवाल ऑनलाइन
कोरोना चाचणीबरोबरच अहवालासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी चाचणी करणाऱ्यांचे अहवाल ऑनलाइन पाठविण्यात येणार आहेत.
तर चिरेखाणीही सुरू
जिथे चिरेखाणी आहेत, तिथे कामगार रहातात, असा अहवाल संबंधित तहसीलदारांनी अपर जिल्हाधिकारी यांना दिल्यास अशा चिरेखाणीही सुरू राहतील, असे सामंत यांनी सांगितले.
मल्टी स्पेशालिटी हाॅस्पिटल
आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आमदार राजन साळवी मल्टी स्पेशालिटी हाॅस्पिटल सुरू होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी शहरात खासगीरीत्या कुणी चालविणार असल्यास त्यांनाही परवानगी देऊ, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
२५ वर्षांवरील सर्वांना लस
सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. शासनाने हाॅटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्या ठिकाणी काम करणारे बहुतांशी कर्मचारी २५ वर्षांच्या पुढील आहेत. त्यांनाही लस मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे.
ॲपेक्सला पुन्हा मंजुरी
रत्नागिरीतील ॲपेक्स रुग्णालयाबाबत तक्रारी वाढल्याने रुग्णालयाची डेडिकेटेड काेविड सेंटरची मान्यता रद्द करण्यात आली हाेती. या रुग्णालयात ज्या त्रुटी आढळल्या आहेत त्या दूर करून हे रुग्णालय पुन्हा सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.